Sanjay Raut On Raj Thackeray MVA : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या हालचाली सुरू असून नेते मंडळी आपआपल्या पक्ष संघटनेचा कार्यकर्त्यांकडून आढावा घेत आहेत. याच अनुषंगाने नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरू आहेत. यातच राज ठाकरे यांनी रविवारी सहकुटुंब मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या तीन महिन्यांतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही सहावी भेट होती. त्यामुळे मनसे आणि शिवसेना (ठाकरे) युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
यातच आता शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. ‘राज ठाकरे यांची महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील बरोबर घेण्याची इच्छा आहे’, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच ‘राज ठाकरे यांची ही भूमिका आहे, पण अद्याप निर्णय नाही’, असंही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
महाविकास आघाडीत नवा भिडू नको अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली आहे, आज बैठक देखील आहे. मग मनसेचा महाविकास आघाडीत समावेश होणार का? तसेच हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आहे की मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचं असेल तर तो निर्णय दिल्लीत होईल, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर संजय राऊत म्हणाले की, “त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही दिल्लीत चर्चा करत आहोत, आमची काही चर्चा झालेली आहे. उद्धव ठाकरे हे मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींशी देखील चर्चा करतील.”
राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यासाठी इच्छुक?
महाविकास आघाडीत येण्यासाठी राज ठाकरे इच्छुक आहेत का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडीत जर एखादा नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे. काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत आहे, काँग्रेसच्या येथील नेतृत्वाला मोठा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीत निर्णय घेतील, त्यानंतर आम्ही सर्व महाराष्ट्रात आहोत आम्ही येथे निर्णय घेऊ”, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंची ही भूमिका, पण निर्णय नाही.
राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत का? असा पुन्हा एकदा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारला. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, “आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो. स्वत: राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील बरोबर घेणं गरजेचं आहे. ही त्यांची भूमिका आहे. पण त्यांचा (राज ठाकरे यांचा) हा निर्णय नाही”, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार
“आम्ही उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. त्यांना एक निवेदन देणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर दुपारी एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहोत. यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, अजित नवले, जयंत पाटील (शेकाप) आदी नेते उपस्थित असणार आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.