देशातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदविण्यात आली आहे. “जनता आमच्या सोबत आहे. आम्ही नवीन चिन्ह घेऊन जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि शिवसेनेला पुन्हा उभी करुन दाखवू.”, असे आव्हान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, “सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य तोडून आता असत्यमेव जयते करावे लागेल. खरेदी विक्री कुठपर्यंत गेली आहे. हे आज स्पष्ट झाले. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. तो पक्ष आणि त्याचे चिन्ह ४० बाजारबुणगे विकत घेतात. याची नोंद इतिहासात राहील. आज या देशातल्या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेने गमावला.”
संजय राऊत पुढे म्हणाले, “या देशामधील सर्व स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातलेच हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. न्यायालय, तपास यंत्रणा, निवडणूक आयोग कुणाचे तरी गुलाम असल्यासारखे वाटत आहे. या निर्णयाला आम्ही नक्कीच आव्हान देऊ. पण ४० बाजारबुणगे पैशांच्या जोरावर बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेऊ शकत असतील तर देशातील जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जाईल.”
“हे सर्व दबावाखाली झालं आहे. महाराष्ट्रावर सूड घेण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर शिवसेना किंवा मराठी माणसाचा अधिकार राहू नये, त्यासाठी फेकलेला हा फास आहे. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही. या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयात काहीही फायदा होणार नाही.”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली आहे. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढची वाटचाल करू असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
