राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशिवाय भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यासह भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं असताना, आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचही शिवाजी महाराजांबाबतचं एक अजब विधान समोर आल्याने, नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटल्याचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. यावरून आता भाजपावर जोरदार टीका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, “अरे कोण प्रसाद लाड ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का? भाजपा मधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक नवीन भाष्य करतो. हे काय दत्तो वामन पोतदार किंवा सेतुमाधवराव पगडी किंवा इतिहासकार जे यदुनाथ सरकार हे आहेत का? या भाजपाचं डोकं फिरलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे, ती शक्तीच यांना संपवेल. शिवाजी महाराजांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार आहे. रोज कोणीतरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो.”

हेही वाचा – “मी शिवभक्त म्हणूनच सांगतोय…; राज्यपाल हटवण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना सहकारमंत्री अतुल सावेंचं आश्वासन

याशिवाय “मला असं वाटायला लागलं आहे, की यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी एक मंत्र देतो आणि मग हे अशाप्रकारे बोलतात. शिवाजी महाराजांवर अशाप्रकारे बोलण्याची यांची लायकी आहे का?, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला?, त्यांच महानिर्वान कुठे झालं? याबाबत अख्ख्या जगाला, देशाला माहिती आहे. रायगडावर त्यांची समाधी आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. आता तुम्ही नवीन शोध लावताय.” असंही राऊत म्हणाले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर “भाजपाने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केली आहे का? जसं मुख्यमंत्र्यांनी एक नवीन नीति आयोग स्थापन करून त्याच्यावर आपल्या बिल्डर मित्राची वर्णी लावली. त्याप्रमाणे भाजपाने नवीन इतिहास संशोधन मंडळ निर्माण करून, तिथे असे हे सगळे जे लोक आहेत लाड, द्वाड यांची नेमणूक केली आहे का? आता हे महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहिणार आहेत का? कठीण आहे कशाप्रकारे सरकार चालवलं जात आहे?” असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.