Sanjay Raut on Raj Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत. नुकतीच त्यांनी सह्याद्री वाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांना राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. राज ठाकरेंनी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना महायुतीत घेण्यात आले नाही. यापुढे राज ठाकरेंना बरोबर घेतले जाईल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला बरबोर घेण्याचा प्रयत्न करू, असे म्हटले होते. यावर आता संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपाच्या हातातील खेळणे झाले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंनी काय करायचे हे भाजपा ठरवते

संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरेंना भाजपाकडून खेळवले जात आहे. राज ठाकरे त्यांच्या हातातील खेळणे झाले आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. काल देवेंद्र फडणवीस यांच्या विधानातून हे स्पष्ट झाले आहे की, भाजपा सांगेल त्या पद्धतीने राज ठाकरे भूमिका घेत आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला आता काही बोलायचे नाही. लोकसभा, विधानसभा आणि आता महानगरपालिकेत मनसेने काय करावे? हे देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत.”

हे वाचा >> Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”

“एका बाजूला महाराष्ट्रामध्ये, मुंबईत मराठीत न बोलता गुजराती, मारवाडीत बोला असा भाजपाचा आग्रह आहे. मराठी लोकांवर दबाव आहे. त्या भाजपाचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कुणाबरोबर जावे, हे पत्ते पिसत बसले असतील तर त्याबाबत राज ठाकरेंनी भूमिका व्यक्त केली पाहीजे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढत राहू, असेही संजय राऊत म्हणाले.

अजित पवार यांच्यानंतर नवाब मलिकांचीही मालमत्ता मुक्त होणार

आयकर विभागाने ६ डिसेंबर २०२१ रोजी बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता मुक्त केली आहे. दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधिकरणाने हा निर्णय दिल्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळाला आहे. मालमत्ता मुक्त झाल्याबद्दल संजय राऊत यांनी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडीने विरोधी पक्षातील लोकांच्याही मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. पण ते भाजपाबरोबर गेले नाहीत, त्यामुळे त्यांची मालमत्ता मुक्त केलेली नाही. आता नवाब मलिक यांचीही मालमत्ता लवकरच मुक्त केली जाईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच त्यांचे स्वतःचे राहते घर आणि गावाकडील वडिलोपार्जित ४० गुंठे जमीन ईडीच्या ताब्यात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. एकाबाजूला अजित पवार यांचे हजारो कोटी मुक्त केले जात आहेत. पण विरोधकांचे राहते घरही सोडले जात नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.