महाविकास आघाडीतील पक्ष भाजपाबरोबर जाणार नाहीत, असे लिहून द्यावे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना लिहिलेल्या पत्रात मांडली आहे. या पत्रानंतर मविआमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. याबद्दल आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या पत्राबाबत आम्ही आज चर्चा करणार आहोत. काही पक्ष अप्रत्यक्षपणे एनडीएला पूरक भूमिका घेतात. उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्याबद्दल हेच बोलले जाते. महाराष्ट्रातही काही लोक आरएसएसचा छुपा अजेंडा घेऊन काम करत आहेत. आम्ही त्या पक्षाविरोधातही लढण्याचे काम करू. प्रकाश आंबेडकर मविआचे सदस्य आहेत. आज उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि मविआच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढच्या रणनीतीबाबत चर्चा केली जाईल.

प्रकाश आंबेडकर मायावतींसारखे वागणार नाहीत

“प्रकाश आंबेडकर हे उत्तम लेखक आहेत. उत्तम वक्ते आहेत. बाबासाहेब आंबेडकरही उत्तम पत्रकार आणि उत्तम पत्र लेखक होते. त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकर चालवत असतील तर त्यांच्या पत्रांचे आपण वाचन केले पाहीजे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. पत्रकांरांनी त्यांना विचारले की, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका संशयास्पद वाटते का? त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “आम्हाला प्रकाश आंबेडकर यांची भूमिका संशयास्पद वाटत नाही. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आमचा मायावतींवर विश्वास नाही, त्या आरएसएसचा अजेंडा चालवत असून भाजपाला मदत करत आहेत. मायावतींवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्या दाबल्या गेलेल्या आहेत. पण प्रकाश आंबेडकरांचे तसे नाही. ते या मातीतले असून बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत. ते मोदींची हुकूमशाही गाडण्यासाठी आमच्याबरोबर ठामपणे उभे राहतील. भाजपाला मदत होईल, अशी कोणतीही भूमिका ते घेणार नाहीत, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”

आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट? केसरकरांचा मोठा दावा; म्हणाले, “राजकीय पथ्य पाळलं असतं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाह यांच्यावरही टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या जाहीर सभेत शिवसेना आणि मविआच्या पक्षांवर टीका केली. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येतात राज्याच्या जनतेचे मनोरंजन करतात. केंद्र सरकारने ३७० कलम काढल्यानंतर शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला होता. पण कलम ३७० हटवून काय दिवे लावले? त्याबद्दल बोलावे. हजारो काश्मीरी पंडित आजही निर्वासितांचे जीवन जगत आहेत. आजही रोज भारताचे लष्करी जवान शहिद होत आहेत, तुम्हाला लाज वाटली पाहीजे. सर्जिकल स्ट्राईकबाबत तुम्ही खोटे बोललात, लाज तुम्हाला वाटली पाहीजे. आजही जम्मू-काश्मीरमध्ये बेरोजगारी आहे. त्यामुळे लाज तुम्हाला वाटली पाहीजे. २०१४ आणि २०१९ साली पाकव्याप्त काश्मीर मिळवू, अशी घोषणा केली, तरीही ते अद्याप जमलेले नाही. पुलवामा घडवून निवडणूक फायदा मिळवला, त्याबद्दल तुम्हालाच लाज वाटली पाहीजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.