Sanjay Raut dasara melava speech : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मेळावा आज मुंबईतील शिवतिर्थावर आयोजित करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला राज्यभरातील शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान य़ा मेळाव्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आज आपल्याकडे लक्ष आहे. ६८ वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जी ठिणगी टाकली. त्याचा हा वणवा मुसळधार पावसात देखील विझू शकत नाही. आतापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा या इथे पाऊस, वादळ असताना आपण मेळावा करत आहोत,” असे संजय राऊत म्हणाले.

“आज मला अनेकांनी प्रश्न विचारले, अनेकांनी शंका उपस्थित केल्या, शिवतिर्थावर चिखल झाला आहे म्हणजे तुम्ही चिखलफेकच करणार… मी म्हटलं होय, गद्दारांवर चिखलफेकच करणार, त्यांची तीच लायकी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ओला दूष्काळ आहे. मराठवाडा पाण्यात आणि चिखलात आहे. आपण दोन तास चिखलत ही सभा घेतली तर वाईट वाटण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर हा आमचा ओला मेळावा आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

रावणाचा आज अंत करायचा आहे. नेहमी रावणाचं दहन होतं. पावसात दहन कसं करायचं? रावणाला जाळायचं की रावणाला बुडवायचा हा विचार करावा लागेल. या मुंबईत पाऊस आहे, या मुंबईत रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतील रावणाला जाळायचा, असे संजय राऊत म्हणाले.

मला विचारलं गेलं की गद्दारांच्या मेळाव्यात काय पुजणार? त्यांना शस्त्रपुजा करण्याचा अधिकार नाही. मग ते काय पुजणार? मला सांगण्यात आलं की, त्यांनी दिल्लीतून अमित शाह यांचे जोडे आणि चपला आणल्या आहेत, ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि ते त्याची पूजा करणार आहेत. आम्ही विचारांची पूजा करतो. हे अमित शाह यांच्या पादुकांची पूजा करणार आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. ही बातमी करता येईल.

मुंबईतील चोर बाजाराचे नाव मोदी बाजार करा…

महाराष्ट्रात वोट चोरी, लोकसभेत वोट चोरी, शिवसेनेची चोरी, धनुष्य बाणाची चोरी, शरद पवारांच्या घड्याळाची चोरी, हे एवढे चोर आहेत, मुंबईतील चोर बाजाराचे नाव मोदी बाजार करा. इतक्या चोऱ्या हे करत आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.