मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे अर्थात रविवारी औरंगाबादमध्ये सभा होणार असून त्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज ठाकरे आजच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. वाटेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत देखील करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याची उत्सुकता लागलेली असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ठाण्यामध्ये मिसळ महोत्सवाला हजेरी लावल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
“महाराष्टात सुडाचं राजकारण सुरू असून हे राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राला आणि देशाला हे परवडणारं नाही, इतकंच मी सांगेन”, अशा शब्दांत संजय राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, राज ठाकरेंचं आज ठिकठिकाणी स्वागत झाल्याबद्दल विचारणा केली असता संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरेंच्या स्वागताकडे बघण्यासारखं काय आहे. महाराष्ट्रात राजकारणाची, नेत्यांची मोठी परंपरा आहे. सभा होत असतात. सभांना लोक जात असतात. नेत्यांचं त्यांचे समर्थक स्वागतही करत असतात”.
“हिंदू ओवैसी आणि नवहिंदु ओवैसी”
“हिंदु ओवैसी आणि मुस्लीम ओवैसी हे दोन्ही महाराष्ट्रात आहेत. एका ओवैसीला उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका जिंकण्यासाठी वापरण्यात आलं, त्याच पद्धतीने नवहिंदू ओवैसींना महाराष्ट्रात शिवसेनेच्या विरोधात लढवून हिंदूंचंच नुकसान करण्याचं काम भाजपा करतोय. याचा औरंगाबादमध्ये अजिबात फरक पडणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“हिंदुह्रदयसम्राट एकच आहेत. देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच लोकांना माहिती आहे. कुणी कितीही शाली पांखरल्या, शिवसेना प्रमुखांच्या कितीही नकला केल्या, तर शिवसेना प्रमुख हिंदुह्रदयसम्राट एकच आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी राज ठाकरेचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.
