उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीची गरजच संपुष्टात आली असताना भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या जनसंवादामध्ये बंडखोरांवर नाराजी व्यक्त करतानाच पुन्हा एकदा नव्याने शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची बाजू ठामपणे मांडणारे शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटसोबत एक फोटो देखील शेअर केला आहे.

संजय राऊतांचं सूचक ट्वीट

संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘लोकशाही’ लिहिलेल्या इमारतीचा फोटो शेअर केला आहे. या इमारतीचा एक खांब खाली पडला असून त्यावर न्यायपालिका असं लिहिलं आहे.

या फोटोसोबत संजय राऊतांनी एक संदेश देखील पोस्ट केला आहे. “न्यायदेवता का सन्मान होगा! फायर टेस्ट.. अग्निपरीक्षा की घडी है..ये दिन भी निकल जाएंगे..जय महाराष्ट्र!” असा संदेश या ट्वीटसोबत संजय राऊतांनी लिहिला आहे.

“आपण एक संवेदनशील मुख्यमंत्री गमावला आहे”

दरम्यान, या ट्वीटसोबतच संजय राऊतांनी अजून एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री अत्यंत ग्रेसफुली पायउतार झाले. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले.. जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ”, असं या दुसऱ्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. तसेच, मुख्यमंत्रीपदासोबतच विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा त्यांनी दिल्याचं जाहीर केलं आहे.