पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शशिकांत वारिशे यांचा रत्नागिरीतील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरीला विरोध होता. याबाबतच्या अनेक बातम्या त्यांनी दिल्या होत्या. याच कारणामुळे शशिकांत वारिशे यांना चिरडून मारण्यात आलं, असा संशय विरोधी पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. या हत्याप्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शशिकांत वारिशे यांची हत्या हे एक षडयंत्र आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत काही पुरावेही सादर केले आहेत. शशिकांत वारिशे यांना ज्या वाहनाने धडक दिली, ते वाहन पंढरी आंबेकर यांचं आहे. तसेच संबंधित वाहनाच्या मागील बाजूस रिफायनरी कंपनीचा लोगोही आहे.

हेही वाचा- Shashikant Warishe Murder: “…आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली” संजय राऊतांचं मोठं विधान!

शिवाय हत्येच्या आदल्या दिवशी आरोपी पंढरी आंबेकर हा अंगणेवाडी येथील जत्रेत हजर होता. याच दिवशी अंगणेवाडीत भाजपाने शक्तीप्रदर्शन करत जाहीरसभा आयोजित केली होती. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे हेही उपस्थित होते. हाच धागा पकडून संजय राऊतांनी शशिकांत वारिशे यांच्या हत्येबाबत सवाल उपस्थित केला आहे. वारिशे यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी आरोपी आंबेकर अंगणेवाडीच्या जत्रेत कोणत्या नेत्यांना भेटला? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.

संजय राऊतांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, “ही पंढरी आंबेकरची गाडी आहे. गाडीच्या मागच्या बाजुला रिफायनरी कंपनी RRPCL चा लोगो आहे. ह्याच कंपनीत ‘सौदी अरेबिया’च्या कंपनीने गुंतवणूक केली आहे. शशिकांत वारिशे यांची हत्या हे एक षडयंत्र आहे. आंबेकर अंगणेवडी जत्रेत हजर होता. ते अनेक नेत्यांना भेटला. संबंधित नेते कोण होते? अंगणेवाडीच्या जत्रेनंतर दुसऱ्या दिवशी शशिकांत मारला गेला.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction on journalist shashikant warishe murder in road accident devendra fadnavis narayan rane rmm
First published on: 12-02-2023 at 14:52 IST