scorecardresearch

गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; संजय राऊत म्हणाले; “१८ वर्षांनंतरही त्यांना…”

बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा पार पडली.

sanjay raut reaction on raj thackeray speech
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेवर ही परिस्थिती ओढवली आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – माहीमच्या समुद्रातल्या ‘त्या’ बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर पालिकेचं मोठं पाऊल!

काय म्हणाले संजय राऊत?

“राज ठाकरेंचं भाषण मी बघतिलं नाही. सकाळी मी वाचलं. त्यांच्या पक्षाला आता १८ वर्ष झाली आहे. त्यांचा पक्ष वयात आला आहे. त्यांच्या पक्षाचं काय सुरू आहे, मला माहिती नाही. आम्ही फक्त आमच्या पक्षाचा विचार करतो. पण १८ वर्षांनंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात. उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. एकनाथ शिंदे, नारायण राणे, भाजपा, राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंवर बोलत असतात. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल सर्वांच्या मनात भीती आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा – “राज ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला अन् शिंदे-फडणवीस सरकारने…”; माहीम कबरीच्या वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

“राज ठाकरेंनी आधी स्वत:च्या पक्षाकडे बघावं”

“या सर्वांनी आधी त्यांच्या पक्षावर बोलावं. राज्यात आज महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न उफाळून वर आले आहेत. यावर कोणी बोलत नाही. फक्त उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते. त्यामुळे विरोधकांमध्ये उद्धव ठाकरेंविषयी असलेली धास्ती स्पष्ट दिसते. १८ वर्षानंतर त्यांनी आता सर्व विसरून स्वत:चा पक्ष कुठं आहे, हे बघावं. रोज उठून उद्धव ठाकरेंवर काय बोलता?” असेही ते म्हणाले.

“…तर कान नाक टोचायचं काम सुरू करा”

“प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते, ती भूमिका घेऊन ते जात असतात. आम्ही आमची भूमिका घेऊन पुढे जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढं जातो आहे. राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. कोणाला धनुष्यबाण मिळालं, कोणाला नाव मिळालं, म्हणून त्यांचा पक्ष होत नाही. आम्ही आमचं काम करतोय. पण तुम्हाला काही कामं नसतील तर कान नाक टोचायचं काम सुरू करा”, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – “राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…”, मनसे पाडवा मेळाव्यावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणे, “उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय..!”

शिंदे गटाला लगावला टोला

पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटालाही टोला लगावला. “उद्धव ठाकरेंनी कुठंही सभा घेतली तरी शिंदे गटाचं वऱ्हाड मागे येतं. त्यामुळे कोण काय बोललं याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला आमची ताकद माहिती आहे”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 10:32 IST

संबंधित बातम्या