Sanjay Raut on Ajit Pawar: राज्यासह संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का देणारा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. मविआसाठी हा निकाल धक्कादायक असला तरी महायुतीमधील पक्षांसाठी तो सुखद धक्का आहे. विशेषतः अजित पवारांना या निकालाचा फायदाच झाला. केवळ ५५ जागा लढवून त्यांना ४१ जागा मिळाल्या आहेत. शिवाय हक्काच्या बारामती मतदारसंघातही त्यांना बऱ्यापैकी मताधिक्य मिळाले. या विजयानंतर आता अजित पवारांचा सार्वजनिक जीवनातला वावर बदलल्याचे पाहायला मिळत आहे. निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दर्शविणे असो किंवा दिल्लीचा दौरा असो, बदललेले ‘अजितदादा’ नजरेस पडत आहेत. यावर आता संजय राऊत यांनीही शाब्दिक कोटी केली असून ‘कायम उपमुख्यमंत्री’ असा त्यांचा उल्लेख करत संजय राऊत यांनी उपरोधिक टोला लगावला.
संजय राऊत काय म्हणाले?
दिल्ली येथे बोलताना संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे कायम उपमुख्यमंत्री आहेत. ते भावी किंवा माजी नसतात, ते सदैव उपमुख्यमंत्री असतात. हे कौतुकास्पद आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पाहायला मिळत आहे. दिल्लीत ते गॉगल बिगल लावून, कोट घालून फिरत आहेत. खरंतर त्यांचे हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळले होते. पण आता ते खूश दिसत आहेत.
एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरचे हास्य कुठे गेले?
एका बाजूला अजित पवारांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला आहे. यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, “उगवता सूर्य आणि मावळती सूर्य यात फरक असतोच. उगवत्या सूर्याचे तेज एका बाजूला दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला मावळतीचा सूर्य आहे. मावळतीचा सूर्य झुकताना, वाकताना आणि ढगाच्या आड जाताना दिसत आहे. शेवटी हे राजकारण आहे. ते चंचल असते, त्यात काय होईल? हे सांगता येत नाही.”
त्यांनी ईव्हीएम देव्हाऱ्यात ठेवावे
संजय राऊत पुढे म्हणाले, त्यांनी आता ईव्हीएम देव्हाऱ्यात ठेवून त्याची पूजा केली पाहीजे. ईव्हीएमचे मंदिर बांधले पाहीजे. एका बाजूला ईव्हीएम, दुसऱ्या बाजूला मोदी-शाह असे मंदिर बांधले पाहीजे, म्हणजे यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम राहिल. पण आम्ही पुन्हा सांगू इच्छितो, ईव्हीएमचा घोटाळा लवकरच बाहेर येईल.