Sanjay Raut on Eknath Shinde’s Jai Gujarat slogan : पुण्यातील गुजराती समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली. या घोषणेनंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत याबाबत म्हणाले होते की “शिंदेंच्या पोटातलं आज ओठावर आलं आहे.” तर काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही शिंदेंवर टीका केली. दरम्यान, राऊत काही वेळापूर्वी म्हणाले की “देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना अशी वक्तव्ये करायला लावून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.”
संजय राऊत म्हणाले, “गुजरातमधी बडोदा येथे गायकवाड घराण्याचं राज्य होतं. त्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जातात, तेव्हा तिथे ते ‘जय महाराष्ट्र’ म्हणत नाहीत. इंदूर व ग्वाल्हेर ही देखील मराठ्यांचीच राज्ये आहेत. शिंदे व होळकर घराण्यांनी तिथे राज्य केलं आहे. तसेच मी देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की लखनौ व कानपूरपर्यंत किंवा त्याही पुढे पेशवे गेले होते. तिथले राज्यकर्ते मराठी आहेत. परंतु, तिथे कार्यक्रमाला गेल्यानंतर योगी आदित्यनाथ ‘जय महाराष्ट्र’ म्हणत नाहीत, ते ‘जय उत्तर प्रदेश’ अशीच घोषणा देतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ‘जय गुजरात’ या वक्तव्यावर सारवासारव करू नये.”
देवेंद्र फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणत आहेत : संजय राऊत
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “जय गुजरात अशी घोषणा देऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम केलं आहे. खरंतर, देवेंद्र फडणवीस हेच एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणत आहेत. तेच शिंदे यांना अशी वक्तव्ये करायला लावत आहेत. वारंवार अशा भूमिका घ्यायला लावत आहेत. गुजराती समुदायाने महाराष्ट्रात विकासाचं एखादं काम केलं असेल. परंतु, त्यांनी इथे पैसे देखील कमावले आहेत, संपत्ती कमावली आहे. इतकी संपत्ती कमावल्यानंतर एखादा हॉल बांधला तर ते काय उपकार करतात का? मुंबईच्या जडणघडणीमध्ये पारसी समुदायाने देखील मोठं योगदान दिलं आहे हे विसरू नका.”
“एक सभागृह बांधलं म्हणून कोणीही इथे दादागिरी करू नये”
संजय राऊत म्हणाले, “मुंबई ही मराठी मजूर, गिरणी कामगार व श्रमिकांच्या घामातून, रक्तातून निर्माण झाली आहे. मुंबई ही काही शेठजींच्या पैशातून निर्माण झालेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाची माफी मागावी आणि हे गुजराती लोक मुंबईत राहतात. इथे पैसे कमावतात, संपत्ती निर्माण करतात आणि त्यातून एखादं सभागृह बांधलं, एखादा मैदानाचं सुशोभीकरण केलं म्हणून त्यांनी दादागिरी करू नये.”