Sanjay Raut vs Devendra Fadnavis on Javed Miandad : आगामी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना खेळणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने बीसीसीआयला या सामन्यासाठी परवानगी दिली आहे. यावरून शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. “हे लोक आता आपला क्रिकेट संघ पाकिस्तानविरोधात खेळवणार आहेत. मग तुमचं गरम सिंदूर गेलं कुठे? तुम्ही घराघरात सिंदूर वाटणार होतात, तो जोश कुठे गेला? कशाला या भाकडकथा रंगवताय?” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जावेद मियाँदादला (पाकिस्तानी क्रिकेटपटू) घरी जेवायला बोलावणारे तुम्हीच होता ना? त्यामुळे एकदा आरसा बघा.” फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत या दोघांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर
आदित्य ठाकरे म्हणाले, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जावेद मियाँदादला बोलावलं नव्हतं. तो स्वतः आला होता. त्याला बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोवर भारतीय संघ पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार नाही. परंतु, नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कोणी खाल्ला, पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी कोणी खाल्ली हे सर्वांना ठाऊक आहे. सिंदूर आमच्या रक्तात आहे म्हणणारे आता आपला संघ पाकिस्तानबरोबर खेळायला पाठवत आहेत. परंतु, तेच लोक पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्या लोकांना विसरले आहेत. पहलगामला गेलेले पर्यटक तुमच्यावर विश्वास ठेवून तिथे गेले होते. काश्मीर सुरक्षित झालं आहे. असं त्या बिचाऱ्यांना वाटत होतं. परंतु, तुमच्यामुळेच ते मारले गेले आणि आता तुम्ही जबाबदारी झटकून पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळत आहात.”
देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत : संजय राऊत
दरम्यान, जावेद मियाँदादला मातोश्रीवर जेवायला बोलावलं असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, “जावेद मियाँदाद स्वतः बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आले आले होते. मुळात देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत. मुळात संपूर्ण भाजपाच अर्धवट ज्ञानी आहे. त्यांचा मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही. काही लोकांचा मेंदू गुडघ्यात असतो. परंतु, भाजपवाल्या लोकांच्या लोकांचा मेंदू गुडघ्यात देखील नाही. त्यामुळे त्यांनी मी तयार केलेला ‘ठाकरे’ या चित्रपट पाहायला हवा. या लोकांनी हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या मुलाखती पाहायला हव्यात. ‘एकवचनी’ हे बाळासाहेबांवरील पुस्तक आहे वाचायला हवं.”