शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यावर विरोधक सातत्याने शिवराळ भाषा वापरत असल्याची टीका करत असतात. या टीकेला स्वतः संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले, मी अजिबात शिवराळ भाषा वापरत नाही. तुम्ही मला एक शब्द दाखवा जिथे मी शिवराळ भाषा वापरलीय. मी कधीच चुकीचा शब्द वापरलेला नाही. तुम्ही एखाद्या शब्दावरून मी काय बोलतो हे ठरवू नका. महाराष्ट्रातले काही भाजपा आमदार आहे जे अशा प्रकारची भाषा वापरत असतात. परंतु, तुम्ही असा प्रश्न त्यांना विचारता का?

संजय राऊत म्हणाले, जे लोक शिवराळ भाषा वापरून आमच्यावर टीका करतात, त्यांना आम्ही त्यांच्या भाषेतच उत्तर देतो. गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरून उत्तर देतो. यापुढेही आमची तशीच प्रतिक्रिया असेल. त्यांना उत्तरं देण्याची आमची ताकद आहे. कोणाला वाटत असेल की माझी भाषा चुकीची आहे तर ती माझी त्या त्या वेळी आलेली प्रतिक्रिया असेल.

मी कधीच शिवराळ भाषा वापरत नाही. हवं तर तुम्ही मला दाखवा की मी अमूक ठिकाणी शिवराळ भाषा वापरली आहे. आरोप करण्यापूर्वी तुम्ही सिद्ध करून दाखवावं. तुम्ही सिद्ध करून दाखवलंत तर मी त्याच क्षणी पत्रकारिता आणि राजकारण सोडून देईन.

शरद पवार की उद्धव ठाकरे, संजय राऊत कोणाचे लाडके?

संजय राऊत हे शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार आहेत. ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. त्याचप्रमाणे संजय राऊत हे शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख) यांचेदेखील निकटवर्तीय आहेत. त्यामुळे संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाचे लाडके आहेत? असा प्रश्न राऊत यांना यावेळी विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले, माझं दोघांबरोबर नाव घेतलं जातं यात चुकीचं काय आहे? मी उद्धव ठाकरेंचा किंवा शरद पवारांचा आहे असं म्हणताय ते ठीक आहे. परंतु, मी मोदींचा नाही असं लोक म्हणतात याचा मला आनंद आहे. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचाही लाडका आहे. त्यात चुकीचं काहीच नाही.

हे ही वाचा >> ‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

खासदार राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आहेत. राज्यातील जनतेने दोघांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. राजकारणात हे दोघेही माझ्यासाठी वरिष्ठ आहेत आणि दोघेही माझ्यावर प्रेम करतात. मला दोघांकडून खूप काही शिकता आलं. यात चुकीचं काहीच नाही.