सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तीन माजी आमदार भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा आहे. यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली असून सोलापूर जिल्ह्यात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी लागलीच पक्षाचे नेते तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना आज (२१ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी भरणे संवाद साधून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न करतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान या घडामोडीवर शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी खोचक भाष्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मोहेळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने आणि माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुबंईत भेट घेतली. या बैठकीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हे तीनही जण भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. या अनुषंगाने मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो.
दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजपाचे नेते जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलत असताना ऑपरेशन लोटस सुरू असून लवकरच जिल्ह्यात दिवाळीचे फटाके फुटतील, अशी प्रतिक्रिया दिली होती. राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हा पक्षप्रवेश दिला जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अजित पवार किस झाड की.. – संजय राऊत
दरम्यान भाजपाकडून मित्रपक्षाचेच नेते फोडले जात असल्याबाबत शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, भाजपात एक हिंदीतील म्हण प्रसिद्ध आहे. ‘ऐसा कोई सगा नही, जिसको भाजपाने ठगा नही’ अजित पवार त्यांच्यासमोर किस झाड की मुली है.
दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
दरम्यान दत्तात्रय भरणे आज सोलापूरात पोहोचल्यानंतर त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली. याची माहिती देताना ते म्हणाले, राजकारणात शेवटी प्रत्येकजण स्वतःच्या सोयीने काम करत असतो. पण आमच्या पक्षातील कोणताच नेता अजित पवार यांची साथ सोडणार नाही, याची मला खात्री वाटते. आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी माझा हा दौरा आहे. या निवडणुकीसंबंधी स्थानिक नेत्यांचे काय मत आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याची माहिती घेऊन तसा अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला जाईल.