राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्षाने टोक गाठले आहे. शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ठाकरे गटातील नेते संजय राऊत शिंदे गट तसेच भाजपावर कठोर शब्दांत टीका करताना दिसतात. तर त्यांच्या टीकेला उत्तर म्हणून संजय राऊत लवकरच पुन्हा एकदा तुरुंगात जातील, असा दावा विरोधकांकडून केला जातो. यावरच आता संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. मला तुरुंगात टाकायला यांच्या बापाचे न्यायालय आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तसेच मी यांच्या धमक्यांना घाबरत नाही, असेही राऊत म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >>> संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानानंतर शीतल म्हात्रेंचे टीकास्र; म्हणाल्या “राऊत साहेब, लवकर…”
सर्व कारवाया बेकायदेशीर
“विरोधकांच्या बापाची न्यायालये आहेत का? मला बेकायदीशर पद्धतीने अटक करण्यात आले. मागील काही महिन्यात अनेक नेत्यांना अटक करण्यात आले. या सर्व कारवाया बेकायदेशीर होत्या. न्यायालयानेच हे सांगितलेले आहे. अनिल देशमुख, चंदा कोचर या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांना न्यायालयाने सुनावले आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >>> ‘मोदी, शाहांना तुरुंगात टाकू’ म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवर चंद्रशेखर बावनकुळे संतापले; म्हणाले “तर राज्यात…”
प्रसिद्धी मिळावी म्हणून आमच्या विरोधात बोलतात
“केंद्रीय तपास यंत्रणांचा अमर्याद गैरवापर करून तुम्ही आम्हाला धमकावत असाल तर आम्ही तुम्हाला भीक घालत नाही. अनिल परब यांच्या कार्यालयावर बुलडोझर फिरवण्यात आले. ही कारवाई बेकायदेशीर आहे. भाजपाने नेमलेले काही लोक प्रसिद्धी मिळावी म्हणून आमच्या विरोधात बोलतात. त्यानंतर अधिकारी दबावाखाली येतात. त्यानंतर कारवाई केली जाते,” असे राऊत यांनी सांगितले. तसेच या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला कधीतरी द्यावीच लागतील. या धमक्यांमुळे आम्ही पळून जाणारे नाही, असे संजय राऊत यांनी निक्षून सांगितले.