गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना नेते दत्ता दळवी यांच्या अटकेच्या प्रकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते दत्ता दळवींना मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. “राज्यात नामर्दांचं सरकार चालू आहे”, असं संजय आज सकाळी राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

दत्ता दळवींची गाडी फोडली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवरून दत्ता दळवींवर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. बुधवारी संध्याकाळी दत्ता दळवींची गाडी काही अज्ञातांनी फोडल्याचं उघड झालं आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. “दत्ता दळवी तुरुंगात आहेत. त्यांच्या घरी कुणी नाहीये. दोन-चार षंढ आले आणि गाडीच्या काचा फोडून निघून गेले. ही त्यांची मर्दानगी. ते भाडोत्री गुंड अशा गोष्टी करण्यासाठी घेतात आणि गुंडगिरी चालवतात”, असं संजय राऊत म्हणाले.

“ज्यानी गाडी फोडली, तो खरा मर्द असता तर त्यानं तिथे थांबायला पाहिजे होतं. पळून काय जाताय? तुम्ही तुमच्या नेत्याच्या सांगण्यावरून आला आहात ना? मग तुमचा नेता नामर्द आहे का? पळून का जाताय? थांबा की. आमचे शिवसैनिक आलेच असते तिकडे. या राज्यात नामर्दांचं सरकार चालू आहे”, अशा शब्दांत राऊतांनी सरकारवर टीका केली.

“आम्ही राज्यपालांना याबाबत विचारू”

दरम्यान, सुप्रिया सुळेंबाबत अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानावरून संजय राऊतांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. “सुप्रिया सुळेंविषयी अब्दुल सत्तारांनी काय भाषा वापरली? शिंदे गटाचे आमदार सुर्वेंनी तंगड्या तोडण्याची भाषा केली होती. काय कारवाई झाली? त्यांच्या मुलानं एका बिल्डरचं अपहरण केलं. काय कारवाई केली? भाजपा, मिंधे गटाचे आमदार ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, त्यांच्यावर काय कारवाई केली?” असा सवाल राऊतांनी केला.

Datta Dalvi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक झालेले दत्ता दळवी आहेत कोण?

“राज्यात दोन कायदे आहेत. गद्दारांसाठी वेगळा आणि जनतेसाठी वेगळा. असं काही असेल तर सरकारनं तसं जाहीर करावं. राज्यपालांना आम्ही त्याबाबत विचारू. ज्या शब्दासाठी दळवींना अटक झाली, तो चित्रपटांमध्ये वापरला जातो. आनंद दिघेंच्या तोंडीही चित्रपटात तो शब्द आहे. त्यामुळे दळवींवर कारवाई करून तुम्ही ज्यांना गुरू मानता, त्यांचा अपमानच करताय”, असंही राऊत यावेळी म्हणाले.

“आपले सुलतान, डेप्युटी सुलतान…”

दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यांमध्ये प्रचारात व्यग्र असल्याची टीका राऊतांनी केली आहे. “अवकाळीचं संकट आस्मानातून कोसळत असताना आपले सुलतान आणि डेप्युटी सुलतान प्रचारात व्यग्र होते. कुणी छत्तीसगडमध्ये, कुणी तेलंगणात होते. जणूकाही ते गेले नसते तर तिथे निवडणुका थांबल्या असत्या. त्यांची मुख्य जबाबदारी होती इथून खोके नेऊन तिथल्या लोकांना सुपूर्त करायची. पण आपली ११ कोटी जनता संकटात असताना त्याबाबतीत त्यांना चिंता नाही”, असं राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ही नौटंकी आहे. पण ज्यांचा राजाच नौटंकी आहे, त्यांचे सरदार नौटंकी असणारच. विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षांचे नेते दोन दिवसांपासून गावागावात जाऊन फिरत आहेत. पण मुख्यमंत्री व त्यांचे सरकार आज जागे झाले आहे”, असंही ते म्हणाले.