महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम समन्वयासाठी आहे. जागावाटप, जागांची अदलाबदल यासंदर्भात कुठलीही चर्चा त्यात होणार नाही. कारण तो विषय संपला आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे, देशात सात टप्प्यात निवडणूक होते आहे. त्यावेळी प्रचाराची दिशा ठरवणं, कुठे कुणी प्रचार करायचा? उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा कुठे होतील? यावर चर्चा होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज संध्याकाळी ४.३० वाजता बैठकीत या गोष्टी ठरतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज महाविकास आघाडीची बैठक

शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्या उपस्थितीत आजची ४.३० वाजताची बैठक पार पडणार आहे. वंचित बहुजन आघाडीशी चर्चा सुरु आहे. त्यांनी जागा जाहीर केल्या आहेत तरीही चर्चा सुरु आहे. निवडणूक व्हायला वेळ आहे. आमची चर्चा निरंतर सुरु आहे असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

देशात असलेली दळभद्री हुकूमशाही, शोषण, भ्रष्टाचार, संविधानाची हत्या हे होऊ नये म्हणून आम्ही लढा देत आहोत. बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाचं रक्षण हे आमची जबाबदारी नाही सर्वाधिक जबाबदारी बाळासाहेब आंबेडकर यांची आहे. भाजपाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असं पाऊल प्रकाश आंबेडकर उचलणार नाहीत. असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

हे पण वाचा- मविआमध्ये धुसफूस; ठाकरे गटाच्या उमेदवार यादीवर काँग्रेसची नाराजी, वंचित बहुजन आघाडीची वेगळी चूल

काँग्रेसची नाराजी आहे का?

“काँग्रेस पक्षातल्या कुठल्या व्यक्तीने काही म्हटलं तर मी त्यावर बोलणार नाही. बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मल्लिकार्जुन खरगे यांनी काही म्हटलं तर मी त्यावर बोलेन. आमची चर्चा जवळपास संपूर्ण झाली होती. आमची यादी त्यानंतर आली आहे. रामटेक या ठिकाणी आमचा विद्यमान खासदार आहे, काँग्रेसने तिथे उमेदवार जाहीर केला. आम्ही तिथे आक्षेप घेतला का? सांगलीची जागा काँग्रेसला काही वाटलं असेल पण आम्हाला कोल्हापूर आणि रामटेकच्या जागेविषयी वाटलंच. सगळ्यांना वाटतं की ४८ जागा लढाव्यात. मग लढावं. आघाडी म्हटल्यावर जागांची अदलाबदल होतेच त्यात विशेष काय? मला हे मान्य आहे की सांगली काँग्रेसचा गड आहे. पण कोल्हापूर, रामटेक या ठिकाणी आम्ही प्रबळ आहोत. आम्ही त्या जागा दिल्याच.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपाला मदत करायची असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही

सांगलीतल्या काँग्रेसमधल्या काही व्यक्ती बोलत असतील तरी चालेल. आम्ही कटुतेने काही बोलणार नाही हे महाविकास आघाडी म्हणून स्पष्ट केलं आहे. सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. अशाच भावना कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. ते म्हणणं आम्ही आमच्याकडे ठेवलं त्याची जाहीर चर्चा केली नाही. अमरावती, रामटेक, कोल्हापूर या जागांवर आम्ही लढतो आहोत. त्या हसत हसत काँग्रेसला दिल्या कारण महाविकास आघाडी आहे. फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही. सांगलीची जागा चंद्रहार पाटील १०० टक्के जिंकणार आहेत. काही व्यक्तिगत कारणांमुळे कुणाला भाजपाला मदत करायची असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील निवडून येतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक त्यांचा प्रचार लवकरच करताना दिसतील. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.