काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले संजय निरुपम भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. वायव्य मुंबई मतदारसंघातून त्यांना लोकसभेची संधी हवी आहे. मात्र, मोदींना पाठिंबा देणाऱ्या मनसेने संजय निरुपम यांना मात्र समर्थन दिलेलं नाही. यावरून सध्या घमासान सुरू आहे. तर, संजय निरुपम यांनी आपण महाराष्ट्राचे जावई असल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून संजय निरुपम चर्चेत आहेत. वायव्य मुंबई मतदारसंघातून त्यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी हवी होती. परंतु, ही जागा ठाकरे गटाकडे गेल्याने त्यांनी अमोल किर्तीकर यांना संधी दिली. यामुळे नाराज झालेल्या संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका केली. पक्षविरोधी कारवाया केल्याने काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली. त्यामुळे संजय निरुपम सध्या भाजपा किंवा शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे गेली आहे. परंतु, महायुतीने या जागेवरून अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही.
हेही वाचा >> “दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात…”, मनसेचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “महाराष्ट्रद्रोही अन् भ्रष्टाचारी…”
दरम्यान, महायुतीकडून रवींद्र वायकर किंवा संजय निरुपम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, या दोघांच्या नावाला मनसेने विरोध केला. मनसे नेत्या शालिनी ठाकरे महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकरांसारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहित धरू नये, असं म्हटलंय.
मनसेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढायला सांगणार्यांवर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा, राज ठाकरे यांनी केवळ देशाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकरांसारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहित धरू नये, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.
यानंतर राजकीय घमासान सुरू झालं. त्यामुळे संजय निरुपम यांनीही आता एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आपण महाराष्ट्राचे जावई असल्याचं म्हटलं आहे. “माझी सासुरवाड़ी महाराष्ट्राची. आणि जावयाचे सासुरवाडीवर जास्त प्रेम असतं एका जावयाला का त्रास देता ? जय महाराष्ट्र!”, असं संजय निरुपम म्हणाले आहे.
संजय निरुपम यांचा राजकीय प्रवास कसा?
एक काळ असाही होता जेव्हा संजय निरुपम हे दोपहर का सामनाचे संपादक होते. त्याच काळात ते शिवसेनेतही होते. मात्र २००५ मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. उत्तर भारतीय फेरीवाल्यांचा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी मुंबई उत्तर जागेवरुन विजय मिळवला होता. संजय निरुपम हे दोनदा राज्यसभेचे खासदार होते. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी उत्तर मुंबई लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं.