राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी काढलेल्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ची सांगता सभा पुण्यात पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते, बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत खासदार सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘शिरूरमधून आमचा उमेदवार निवडून आणणारच’ असा निर्धार व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं. या विधानाचा धागा पकडून संजय राऊतांनी अजित पवारांची नक्कल करत इशारा दिला आहे.

“…तर पहिले तुम्ही पडाल”

संजय राऊत म्हणाले, “मी एक वक्तव्य ऐकलं, ‘काहीही झाले तरी मी तुम्हाला पाडणारच…’ पण, आमच्या पाडा पाडीच्या खेळात पडला, तर पहिले तुम्ही पडाल… नाव घेऊन बोलायचं असतं, आमच्यात दम आहे. ‘हवा बोहोत तेज चल रही है, अजितराव… टोपी उड जायेगी.'”

“दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते, पण…”

“शेतकऱ्यांचे पाच, सहा प्रश्न घेऊन अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेले असते, तर ‘रामलल्लाचे दर्शन मोफत करून देऊ’, असं सांगितलं असतं. दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते. पण, त्यावरही ‘रामलल्लाचे दर्शन मोफत घडवू,’ हेच उत्तर आहे,” असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गुजरातला एकदाच सोन्यानं मढवून टाका”

“महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता सरकारनं दिल्लीच्या वाटेवर पायपुसण्यासारखी टाकून ठेवली आहे. पाय पुसायचा आणि पुढे जायचं… आज महाराष्ट्र आणि शेतकरी लुटला जात आहे. महाराष्ट्र आणि मुंबईनं देशाचे पोट भरायचा. पण, महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योग गुजरातला पळवला जातोय. मराठी माणसाच्या भाग्याचं आणि कष्टाचं एकाच राज्यात जातोय. त्यापेक्षा गुजरातला एकदाच सोन्यानं मढवून टाका,” अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे.