छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात निघालेल्या ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची घटना समोर आली आहे. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निघालेल्या ठेवीदारांच्या मोर्चावर लाठीहल्ला झाल्याची ही घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ घडली आहे. पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. परिणामी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला, असं सांगितलं जात आहे. याबाबत विचारल्यावर पोलीस म्हणाले, हा मोर्चा विना परवानगी काढण्यात आला होता.

सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करावेत, आम्हाला मंत्र्यांना भेटू द्यावे अशी मागणी खासदार जलील यांनी यावेळी केली. पोलिसांनी मोर्चेकरांना सुरुवातीला स्पीकरवरुन काही सूचना दिल्या. तरीही मोर्चा सुरु होता. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान, या मोर्चावरून सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटातील (शिवसेना) नेत्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट म्हणाले इम्तियाज जलील यांनी या शहराचं वातावरण बिघडवायचं ठरवलं आहे. हे निजामवाले आहेत. आज (१६ सप्टेंबर) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात आहे. मराठवाड्यातील प्रत्येकजण आनंदोत्सव साजरा करत आहे. यांना (जलील) त्याची पोटदुखी आहे.

हे ही वाचा >> “डेंग्यूसारखाच सनातन धर्मही….”, उदयनिधींच्या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच भाष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय शिरसाट म्हणाले, निजामाच्या तावडीतून आम्ही कसे मुक्त झालो? असा प्रश्न त्यांना पडल्यामुळे ते असे मोर्चे काढत आहेत. ते काही समाजिक प्रश्न घेऊन मोर्चे काढत नाहीत. त्यांना जातीय दंगल भडकवायची आहे. परंतु, पोलीस त्यांचं कर्तव्य करत आहेत आणि सरकारचा पोलिसांना पाठिंबा आहे.