सोलापूर : आषाढी वारीसाठी विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ घेऊन पंढरपूरकडे निघालेल्या अनेक लहान-मोठ्या संतांच्या दिंड्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा पंढरपूरच्या अलीकडे करमाळा तालुक्यात काल रविवारी पोहोचला. त्यानंतर सोमवारी सकाळी करमाळा शहरवासीयांना दर्शन देऊन हा पालखी सोहळा सायंकाळी जेऊर मुक्कामी जाऊन विसावला. सुमारे एक लाख वारकरी आणि भाविकांचा सहभाग राहिलेल्या या पालखी सोहळ्याला जत्रेचे रूप आले होते.
रात्री रायगाव येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी सोहळा करमाळा शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला. एव्हाना, हजारो करमाळेकर संत निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी आसुसलेले होते. करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपासे यांनी शहरात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. राशीनपेठ तरूण मंडळाने दरवर्षाप्रमाणे यंदाही हजारो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची सेवा रुजू केली. त्यावेळी पालखी सोहळा काहीवेळ विसावला होता. त्यानंतर ताजेतवाने होऊन वारकरी संत निवृत्तीनाथांचा रथ ओढत, ज्ञानबा-तुकाराम आणि विठ्ठलाच्या नामाचा गजर करीत, टाळ मृदंगाच्या तालावर भजन तेवढ्याच तालासुरात गात जेऊरच्या दिशेने निघाले. यानिमित्ताने करमाळा परिसरात सेवा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
महिला अधिकाऱ्यांच्या फुगड्या
आषाढी वारीच्या नियोजनासाठी प्रशासनही गेले काही दिवस अहोरात्र कार्यरत आहे. संतांच्या पालख्या, दिंड्यांचे स्वागत करताना प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही ज्येष्ठ-कनिष्ठतेचा भेदभाव पाळला जात नाही. करमाळ्याभध्ये संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे स्वागत करताना अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह आणि तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह इतर महिला मंडल अधिकारी, महिला तलाठी अशा साऱ्याजणी एकमेकांत मिसळून गेल्या होत्या. त्यातूनच तहसीलदार ठोकडे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी उत्साही वातावरणात कपाळी गंध लावून फुगड्यांचा डाव मांडला. ज्ञानोबा-तुकारामांच्या लयबद्ध गजरात या दोघींनी फुगड्या खेळल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या शिकवणीप्रमाणे खाली वाकून पदस्पर्श केला. या दोघी महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिला तलाठ्यांबरोबरही फुगड्या खेळल्या आणि नंतर एकमेकांना तेवढ्याच आदराने पदस्पर्श केला. यातून एरव्ही, वरिष्ठ अधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांना फर्मान सोडताना मनात असलेला अधिकारभाव कोठेही दिसला नाही. यानिमित्ताने मिळालेला मनसोक्त आनंद आणि समाधान वेगळेच होते.