कराड : बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने दुचाकीस्वार बचावल्याची घटना नडशी (ता. कराड) येथील तळी नावाच्या शिवारात घडली. बिबट्याने दुचाकीस्वार युवकावर हल्ला केल्याप्रसंगी पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या युवकाने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.
बिबट्याच्या हल्ल्यात बिबट्याचा पंजा दुचाकीच्या मागील आसनावर लागल्याने ते फाटले, नडशी येथील युवक समाधान माने दुचाकीवरून तळी नावच्या शिवारातून जात असताना, अचानक बिबट्याने त्याच्या दुचाकीवर झेप घेतली. याचवेळी पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या अमोल पवार याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने शिवारात पळ काढला आणि समाधान माने बचावला.
ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाला या घटनेची माहिती दिली. वनरक्षक सानिका घाडगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कॅमेरा ट्रॅप तर, सातारा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नडशी परिसरात बिबट्या आणि त्याच्या दोन बछड्यांचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. तर, आज बिबट्याच्या दुचाकीस्वारावारील हल्ल्याचे वृत्त समाज माध्यम समूहावर पसरल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात लोकवस्ती असल्याने शेळ्या, कुत्री यांना बंदिस्त शेडमध्ये बांधावे, रात्री उजेडासाठी दिवे सुरू ठेवावेत. अफवा पसरवू नये, बिबट्याची छायाचित्रे काढण्याचा मोह टाळावा, असे आवाहन वनरक्षक सानिका घाडगे यांनी केले आहे.