सातारा : सातारा जिल्ह्यात करोनाचे एकूण १९ रुग्ण आढळले आहेत. यातील सहा रुग्णांवर सातारा व कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकरा रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक युवराज कर्पे यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात करोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. मागील पंधरा दिवसांत सातारा जिल्ह्यात करोनाचे एकूण १९ रुग्ण आढळून आले आहेत. दोन रुग्ण जिल्हा रुग्णालयात, एक सातारा येथील खासगी रुग्णालयात, कराड येथील दोन कृष्णा रुग्णालयात व एक सह्याद्री रुग्णालयात दाखल आहेत. अकरा रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे, यातील काही जणांना कृत्रिम श्वास सुरू आहे तर काही जणांची प्रकृती उत्तम आहे. जिल्हा रुग्णालयात करोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७० वर्षीय महिलेचा व कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या ७९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक कर्पे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या निष्पन्न होत असल्याने याबाबतची तपासणी वाढवावी, औषधे उपलब्ध करावी, अशा रुग्णांची काळजी घ्यावी आदी सूचना नुकत्याच झालेल्या याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केल्या होत्या. या आजाराबाबत लोकांनी भीती न बाळगता काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मुखपट्टीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.