सातारा : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सातारा बसस्थानकावर महिलांची गर्दी झाली होती. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेले होते. स्वारगेट, मुंबई व वाई, फलटण व ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र आज रविवारी दुपारनंतर गर्दीमध्ये आणखीनच वाढ झाली.

महिला सन्मान योजनेत एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत आहे, त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांनी सकाळपासूनच ठिकठिकाणी जाण्यासाठी सातारा, वाई, फलटण, कराड बसस्थानकावर गर्दी केली होती. पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, कराड, पंढरपूर, विजापूर, कोल्हापूर, कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी बस हाऊसफुल्ल भरून वाहताना दिसत होत्या. त्यातच शनिवार व रविवार अशी जोडून सुट्टी आल्याने नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी असलेले चाकरमानीही रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे आले आहेत. त्यामुळे एसटीकडे शनिवारी महिला प्रवाशांचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून येत होता.

सातारा विभागातील ११ आगारांमार्फत ठिकठिकाणी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. तसेच ज्या मार्गावर जास्तीत जास्त प्रवासी असतील त्या ठिकाणीही त्वरित बस सोडण्यात येत होत्या. सातारा बसस्थानकावर स्वारगेट व वाईकडे जाण्यासाठी प्रवाशांनी रांगा लावल्या होत्या. मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची दुपारपर्यंत गर्दी कमी होती. मात्र दुपारनंतर मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांचा ओढा वाढला होता. सातारा बसस्थानकावर अधिकारी व कर्मचारी तळ ठोकून होते. तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. विविध मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्याने काही काळ वेळापत्रक कोलमडून गेले होते. स्वारगेट व मुंबईकडे वाईला जाण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र मागील तीन दिवस होते.

रक्षाबंधनामुळे मुंबई-पुणे व साताऱ्यातील शहरात आणि गावात जाण्यासाठी महिला भगिनी आपल्या खासगी गाड्यातून आल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. खेड शिवापूर आणेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. खंबाटकी घाटातही काही वाहने बंद पडली होती. वाहनांच्या गर्दीने वाहतूक कोंडी झाली होती.