सातारा : साताऱ्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वीर, धोम, धोम बलकवडी, उरमोडी यांसह सर्व छोटी-मोठी धरणे पाझर तलाव काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ झाल्यास या विसर्गात वाढ करण्यात येईल, असेही कार्यकारी अभियंता, सातारा व कृष्णा सिंचन विभाग यांनी कळविले आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे दुर्गम भागातील अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. आपत्ती असलेल्या भागातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
साताऱ्यातील वीर, धोम व धोम बलकवडी, उरमोडी, कण्हेर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारे वीर धरण भरल्याने नीरा नदी पात्रात सायंकाळी सहा वाजता ४२हजार ७२४ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे पाण्यात उतरू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी केले आहे.
नीरा साखळीतील विसर्ग
भाटघर (२०५१४), नीरा देवघर (६८००) सह गुंजवणी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धोम बलकवडी धरण ९९.५० टक्के भरल्याने धरणातून सांडवामार्गे सायंकाळी सहा वाजता सहा हजार ६६१ क्युसेक विसर्ग कृष्णा नदी पात्रातून धोम धरणात सोडण्यात आला आहे. धोम धरणातून चौदा हजार ५१० क्युसेक विसर्ग कृष्णा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे वाई गणपती घाट छोटा पूल, चिंधवली, मर्ढे, खडकी (वाई) हे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलावरून लोकांनी जाणे येणे टाळावे, असे धोम धरण पूरनियंत्रण कक्षातून कळविण्यात आले आहे.
कण्हेर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून वेण्णा नदी पात्रात बारा हजार क्यूसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. उरमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून सहा हजार १५५ क्युसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ झाल्यास या विसर्गात वाढ करण्यात येईल, असेही कार्यकारी अभियंता, सातारा व कृष्णा सिंचन विभाग यांनी कळविले आहे.