सातारा: सर्वांत मंगलमय आणि उत्साहवर्धक अशा गणेशोत्सवाला आज बुधवारी घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करून तर सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील प्रमुख चौकाचौकांत मंडपामध्ये भव्य गणेश मूर्ती स्थापना करून सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढलेल्या मिरवणुका आणि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय घोषात आज गणपतीचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
यंदा जनजागृती आणि पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘आवाजाच्या भिंती’(डॉल्बी यंत्रणा), तीव्र प्रकाशझोत (लेझर दिवे) यांचा मिरवणुकीतील वापर लक्षणीयरित्या कमी झालेला आढळला. तत्पूर्वी सकाळी मुहूर्तावर घरगुती गणेशाचेही उत्साहात आगमन झाले. दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सीसीटीव्ही आणि ‘ड्रोन’चीही मदत घेण्यात आलेली आहे.

दिवसभर पडणाऱ्या रिमझिम सरीतही गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सकाळपासून लगबग सुरू होती. मोरया…च्या जयघोषात घरोघरी व सार्वजनिक मंडळांच्या विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना, सार्वजनिक मंडळांच्या भर पावसातही मिरवणुकांचा उत्साह होता. घरगुती गणेश मूर्ती दुपारी एक वाजून ५४ मिनिटांपर्यंतच्या मुहूर्तावर विराजमान करण्यात आल्या.
यावर्षी गणेशोत्सव अकरा दिवस सुरू राहणार आहे. रविवारी गणेशाच्या बहिणी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे घरोघरी आगमन होणार आहे. दरम्यान, सातारा शहरातील प्रमुख सार्वजनिक मंडळ आणि गणेश मंदिरांमध्ये गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून गणेश मूर्तींना अलंकार पूजा करण्यात आल्या होत्या.
शहरातील पंचमुखी गणेश मूर्ती गणेश मंदिर, फुटका तलाव गणेश मंदिरात तसेच राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश मंदिरात विविध अलंकारांनी सुशोभित करून गणेश मूर्तींना सजवण्यात आले होते. फुटका तलाव मंडळांनी यंदाही दरवर्षीप्रमाणे पाण्यामध्ये तरंगत्या तराफा यावर आकर्षक भव्य अशी गणेश मूर्ती स्थापन केली आहे. शहरातील सदाशिव पेठेतील मानाचा आणि महागणपती म्हणजेच सम्राट गणेश मंडळांनी यावर्षी आदल्या दिवशी सायंकाळी गणेश मूर्ती मंडपात आणून विराजमान केली.

शेटे चौकातील मानाच्या श्री प्रकाश गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ८६ वे वर्ष असून, याही पर्यावरणपूरक शंकर-पार्वती गणेशाची मूर्ती मान्यवरांच्या हस्ते बुधवारी सकाळी प्रतिष्ठापना करण्यात आली. सातारा शहरातील राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश मंदिरात विविध चांदीचे अलंकार घालून मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली होती. दिवसभर अधून-मधून पडणाऱ्या रिमझिम सरीतही अनेक गणेश मंडळांनी मंडळाच्या मूर्ती मंडपात वाजत गाजत आणल्या.
सातारा शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक यांचेसह अनेक संस्थांनी आपल्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना सकाळच्या वेळात मान्यवर पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते केले. अनेक मंडळांच्या देखावा उभारणीचे काम प्रगतीपथावर असून, हे देखावे साधारण रविवारपासून पाहण्यासाठी खुले होतील.
गणेश पूजेसाठी लागणारी पत्री, कमळे, घेवडा, शेवंती, गुलाब तसेच सुवासिक चाफा या फुलांना प्रचंड मागणी होती. सातारा शहरातील प्रमुख चौकात पूजेत नैवेद्यासाठी लागणारी मिठाई तसेच मोदकांचे विविध प्रकारही मिठाई तज्ज्ञांनी बनवले होते. त्याच्या खरेदीसाठीही आज सकाळपासूनच ग्राहकांची झुंबड उडाली होती.

विसावा नाका परिसरात राजस्थानी कलाकारांनी बनवलेल्या सुबक गणेश मूर्ती खरेदीसाठीही जिल्ह्यातून ग्राहक आल्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. अनेक मंडळांनी रात्री उशिरा गणेश मूर्तींची वाजत गाजत मिरवणूक काढून मंडपात त्यांची प्रतिष्ठापना केली .
जलमंदिरात प्रतिष्ठापना
सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी त्यांचे चिरंजीव छत्रपती वीरप्रतापराजे यांच्या हस्ते, याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.