सातारा : आदिशक्तीचा उत्सव असणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला जिल्ह्यात आज सोमवारपासून सुरुवात होत आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये सकाळी आठ ते मध्यान्ह दुपारी चारपर्यंत घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर देवीचा जागर करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील व जिल्ह्यातील मंदिरे फुलांच्या सजावटीसह, विद्युत रोषणाईने सज्ज झाली आहेत.

सातारा जिल्ह्यातील नवरात्र उत्सवाला वेगळी परंपरा आहे. जिल्ह्यातील औंध यमाई, मांढरदेव येथील काळेश्वरी, सातारा शहरातील मंगळाई देवी, मंगळवार तळ्यावरची तुळजाभवानी, शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावरील तुळजाभवानी, कास बामनोली रस्त्यावरील घाटाई देवी, कोपर्डे येथील नागाई देवी, सातारा शहरालगतच्या जानाई मळाई देवी, देऊर येथील मुधाई देवी, पाली खंडोबा, कण्हेर येथील वाघजाई, पांडे, असले येथील भवानी येथील भैरवनाथ मंदिरातील आदी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई सह धार्मिक कार्यक्रमांसाठी ही शक्तिपीठे सज्ज झाली आहेत. या सर्व ठिकाणी पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा होणार आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यासाठी औंध व मांढरदेवी तसेच ठिकठिकाणच्या देवस्थानाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. नऊ दिवसांच्या या उत्सव काळात पूजा अभिषेकासह धार्मिक कार्यक्रम, भजन भोंडला, श्रीसूक्त पठणासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पारंपरिक उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड देऊन मंदिरांसह विविध संस्था संघटनांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबाबत महिलांचा सन्मान, कन्यापूजन तसेच भोंडला, गरबा दांडिया या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा शहरामध्येही विविध नवरात्र उत्सव मंडळांनी रविवारीच देवीचे मंडपात आगमन केले आहे. सोमवारी श्रीसूक्त पठणानंतर पारंपरिक पूजनासह देवीचा जागर करण्यात येणार आहे. यंदाचा उपवास आणि फराळ दर वाढल्याने सातारकरांसाठी महाग होण्याची चिन्हे आहेत. पूजा साहित्य देवीसाठी महावस्त्र दागिने सजावटीचे साहित्य कन्या पूजनासाठी विविध वस्तूंच्या बाजारपेठेत खरेदीसाठी महिला वर्गाची गर्दी झाली आहे.