कराड : कोरीवळे (ता. कराड) येथील ओढाजोड प्रकल्पामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळेल. त्याचबरोबर गावाच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
कोरीवळे येथे ओढाजोड प्रकल्पाचे लोकार्पण व विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक जयंत जाधव, कराड सोमनाथ जाधव, रामचंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब पाटील म्हणाले, या ओढाजोड प्रकल्पामध्ये एका ओढ्यावर सिमेंट बंधारा बांधून त्यामधील पाणी दुसऱ्या ओढ्यामध्ये सोडण्यात आल्यामुळे शेती सिंचनाची मोठी सोय झाली. तसेच या प्रकल्पामुळे ओढ्यालगत असणाऱ्या सुमारे ४५ विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजना प्रशासकीय मान्यता नावीन्यपूर्ण योजनेतून साडेसतरा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हे काम ९ ऑक्टोबर २०२४ रोजी पूर्ण झाले. या प्रकल्पामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळेल, त्या माध्यमातून शेती बागायत होवून ग्रामस्थांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास पाटील यांनी दिला.