सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संशयित प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी मुख्य संशयित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने अद्याप फरार आहे. त्याच्या तपासासाठी पोलीस पथके कार्यरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. बनकरला न्यायालयात आज हजर करण्यात आले असता त्याला पुढील चौकशीसाठी २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने बनकर आणि बदाने या दोघांकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळास कंटाळून गुरुवारी रात्री आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही फरार होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी कालच दोन पथके रवाना केली होती. यातील एक आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी आज पुण्यात अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुख्य संशयित पोलीस उपनिरीक्षक बदाने याचा पोलीस शोध घेत आहेत, असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ असलेल्या हॉटेलचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण ताब्यात घेतले असून, त्यामध्ये घटनेच्या रात्री संबंधित डॉक्टर तरुणी एकटीच हॉटेलमध्ये गेल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर या फलटणमध्ये ठाण मांडून आहेत, असेही दोशी यांनी सांगितले.

आधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता

फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षकांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिला डॉक्टरांची सध्या चौकशी सुरू होती. या वेळी चौकशी समितीसमोर झालेल्या सुनावणीवेळी या डॉक्टरांनी आपल्यावर दबाब आणला जात असल्याची तक्रार केली होती. याबाबत फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. धुमाळ यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज कर्पे यांना याबाबत विचारले असता त्यांनी संबंधित महिला डॉक्टरने सुनावणीवेळी अशी तक्रार केल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे. पण त्यांनी व्यक्तिगतरित्या आपल्याकडे याबाबत तक्रार केलेली नव्हती, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आत्महत्या केलेल्या संबंधित डॉक्टरांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आज साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनीही तिच्यावर यंत्रणा, लोकप्रतिनिधींचा सतत दबाब असल्याचा आरोप केला आहे.

चौकशी समिती स्थापन

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य शासनाच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसंचालक भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नेमण्यात आली आहे. त्यांना मदतीसाठी सातारा जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आज दौरा

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विविध कार्यक्रमांसाठी ते येत असले तरी या घटनेबाबत ते माध्यमांशी काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावरून राज्यभर खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी याविषयी काहीही बोलणे टाळले. तर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी याप्रकरणामुळे सातारा जिल्ह्याची आणि फलटण तालुक्याची मोठी बदनामी झाल्याची खंत व्यक्त केली.