सातारा : पसरणी (ता. वाई) येथील तरुणाला कोल्हापूरमधील काही युवकांनी मंगळवारी रात्री बेदम मारहाण करून अपहरण केले होते. वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने कोल्हापूर पोलिसांची मदत घेत अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करून पाच संशयितांना अटक केली. संशयितांना वाई न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली.
अपहरण झालेला तरुण मूळचा कोल्हापूरचा आहे. तर गणेश विश्वास काटकर, प्रशांत प्रकाश सुर्वे, शुभम सुनील जाधव, मानसिंग विजयसिंह भोसले, अभिजित उर्फ पंप्या सर्जेराव तवंदकर (सर्व रा. उत्तेश्वर मंदिर महादेव, कोल्हापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत वाई पोलिसांनी सांगितले की, तरुण लहानपणापासूनच कोल्हापुरात राहात आहे. त्याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेम प्रकरण चालू होते, त्यातूनच त्याने त्या महिलेला फूस लावून पसरणी येथे पळवून आणले होते. तेव्हा या सातजणांनी पसरणीत येऊन त्याला मारहाण करत बरोबर आणलेल्या गाडीतून त्याचे अपहरण करून कोल्हापूरला नेले. अपहरण झाल्याचे वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना समजताच त्यांनी त्वरित वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाला शोधार्थ पाठवले. या पथकाने कोल्हापूर पोलिसांची मदत घेत अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करून संशयितांना अटक केली. संशयितांना वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच तरुणावर वाईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.