वाई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गजानन हणमंत ननावरे (वय ५१) यांचा करोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात वाई पोलीस ठाण्यातील सोळा कर्मचारी करोनाबाधित झाले होते, यामध्ये ननावरे यांचा समावेश होता. जिल्ह्यात करोनामुळं पोलिसाचा बळी गेल्याची ही पहिलीच घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई पोलीस ठाण्यात आढळलेल्या १६ करोनाबाधित कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र, यातील पोलीस हवालदार गजानन ननावरे यांना मधुमेह व हृदयविकाराचाही त्रास होता. दरम्यान, उपचारांवेळी त्यांना पक्षघाताचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना पुणे येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ननावरे यांची प्रकृती मागील दोन दिवसात सुधारली होती. काल दुपारी त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना कृत्रीम श्वसन यंत्रणेचा आधार देण्यात आला होता. दरम्यान, आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी येताच सातारा पोलिसांमध्ये शोककळा पसरली. ननावरे या आजारातून बरे व्हावेत यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक अजित टिके, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी त्यांच्यावर चांगले उपचार करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आज दुपारी त्याच्या मृत्यूची बातमी धडकली आणि वाई पोलिसांमधील वातावरण सुन्न झाले.

ननावरे हे मनमिळावू आणि धाडसी पोलीस कर्मचारी होते. त्यांनी सातारा मुख्यालय, मेढा, महाबळेश्वर, वाई आदी ठिकाणी सेवा बजावली होती. त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. करोना संसर्गामुळे जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्याचा हा पहिलाचा बळी आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara police personnel of wai police station died due to corona infection aau
First published on: 25-07-2020 at 09:16 IST