सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीची आत्महत्या ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. संबंधित महिला डॉक्टरने याबाबत वेळीच कुणाला सांगितले असते तर त्यांचे प्राण आज वाचले असते. या घटनेचा प्रशासकीय बाबींशी अर्थाअर्थी संबंध नसल्याचे साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
डॉक्टर तरुणीची आत्महत्याप्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. त्या मागील दोन दिवसांपासून फलटण येथे ठाण मांडून आहेत. नियमित तपासकामाचा सूचना देऊन आढावा घेत आहेत. याविषयी माहिती देण्यासाठी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
कडूकर म्हणाल्या की, संबंधित डॉक्टर तरुणीला जर त्रास होत होता, तर त्यांनी वेळीच कुणाला तरी सांगायला हवे होते. नातेवाईक, मित्र यांना माहिती दिली असती तर वेळीच या प्रकरणात दखल घेतली गेली असती आणि डॉक्टर तरुणीचे प्राण वाचले असते. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे.
ही २९ वर्षीय डॉक्टर साताऱ्याच्या फलटणमधील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. गुरुवारी रात्री फलटण शहरातील एका हॉटेलमधील खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. मृत डॉक्टरने आपल्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिले असून, त्यात दोघांचा उल्लेख केलेला होता. यापैकी एक फलटणमधील पोलीस उपनिरीक्षक असून, दुसरा व्यक्ती त्या डॉक्टर भाड्याने राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा आहे.
वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील विसंवादामुळे ही घटना घडली का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, आरोपीला न्यायप्रक्रियेत येऊन पीडितांना न्याय देणे हे वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे काम असते. ही घटना अपवादात्मक आहे.
ज्या कारणास्तव महिला डॉक्टरने आत्महत्या केली, ती त्यांची वैयक्तिक बाब वाटत आहे. त्याचा प्रशासकीय बाबींशी अर्थाअर्थी संबंध नाही असे वाटते, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, या प्रकरणी मुख्य संशयित पोलीस उपनिरीक्षक बदाने याचा पोलीस शोध घेत आहेत, असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ असलेल्या हॉटेलचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण ताब्यात घेतले असून, त्यामध्ये घटनेच्या रात्री संबंधित डॉक्टर तरुणी एकटीच हॉटेलमध्ये गेल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर या फलटणमध्ये ठाण मांडून आहेत, असेही दोशी यांनी सांगितले.
