सातारा : अल्पवयीन मुलांतील भावनिक गुंतागुंत आणि इतर बाबींमुळे शालेय विद्यार्थी अस्वस्थ असतात. त्यातच मोबाइल, समाजमाध्यमातून होणाऱ्या इतर बाबींच्या माऱ्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट बाबींना चालना मिळत आहे. या बाबी रोखण्यासाठी, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, तसेच गुन्हा आणि गुन्हेगारमुक्त शालेय परिसर राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याची मागणी करणारे निवेदन साताऱ्यातील १६ शाळांच्या वतीने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना देण्यात आले.
या वेळी गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, हिंदवी पब्लिक स्कूलचे अमित कुलकर्णी, पेरेंट्स असोसिएशन स्कूलच्या मुख्याधापिका स्नेहा टाकेकर, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे वरिष्ठ व्यवस्थापक मनोज जाधव, शानभाग शाळेचे मुख्याध्यापक अभिजित मगर उपस्थित होते. या वेळी चोरगे यांनी शाळांसमोरील आव्हाने, सोशल मीडियाचे अतिक्रमण, अवैध पद्धतीने अमली पदार्थांची विक्री याबाबतचे वास्तव पोलीस अधीक्षक दोशी यांच्यासमोर मांडले. यानंतर उपस्थित शाळा प्रतिनिधींची मते जाणून घेत दोशी यांनी निवेदनातील मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.
या वेळी शिष्टमंडळाने शाळा सुटताना, भरताना शाळा परिसरात कर्मचारी तैनात करावेत. अल्पवयीन वाहनचालकांसह पालकांवर कारवाई, निर्भया पथकाचा सहा महिन्यांतून एकदा प्रबोधनात्मक कार्यक्रम, अल्पवयीनांकडून होणाऱ्या मोबाइल वापराबाबत पालकांना सूचना करणे, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कठोर निर्बंध, शहरातील ऐतिहासिक व पर्यटन स्थळांवर गस्त वाढविण्याबाबत मागण्या केल्या.
शिष्टमंडळात गुरुकुलसह मीना स्कूल, निर्मल कॉन्व्हेंट स्कूल, सातारा इंग्लिश मीडिअम स्कूल, रयत इंग्लिश स्कूल, दातार शेंदुरे स्कूल, जे. डब्ल्यू. आयरन ॲकॅडमी, न्यू इंग्लिश स्कूल सातारा, कन्या शाळा, अनंत इंग्लिश स्कूल, महाराजा सयाजीराव स्कूल, अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या वतीनेही निवेदनावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.