सातारा : नवभारत साक्षरता अभियानाचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने सातारा जिल्हा परिषद व जावळी पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात समाज प्रबोधनपर ओव्यांची निर्मिती तालुक्यातील शिक्षिकांनी करून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जावळी तालुका हा दुर्गम व डोंगराळ तालुका अशी ओळख आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीचे रडगाणे न गाता शैक्षणिक क्षेत्रात शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये व नवनवीन यशाचे आलेख निर्माण केले आहेत. शिष्यवृत्तीच्या या यशात तालुक्यातील शिक्षक वर्गाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही शैक्षणिक उपक्रमाचा प्रारंभ बऱ्याचदा जावळी तालुक्यातून यशस्वीपणे करता येतो. हा मागील अनेक वर्षांचा पायंडा झाला आहे. या ओव्यांच्या माध्यमातून साक्षरतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याबरोबरच लोकजागृतीही साधली गेली. गावागावांमध्ये साक्षरतेबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या उपक्रमाची निर्मिती व संकल्पना बिरामणेवाडी (ता. जावळी) शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली गोडसे यांनी केली. मेढा शाळेतील शिक्षिका योगिता मापारी, प्रियांका किरवे, शिल्पा फरांदे आदींनी विशेष साहाय्य केले. करोनाच्या काळातही या शिक्षिकांनी समाजप्रबोधनासाठी जात्यावरील ओव्यांद्वारे समाजजागृतीचा प्रयत्न केला होता.
उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अनिस नायकवडी आणि गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
ओव्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा हा अभिनव उपक्रम साक्षर भारताच्या वाटचालीला वेग देणारा ठरेल, यात शंका नाही.सहभागी शिक्षीकांच्या या प्रयत्नामुळे साक्षरता चळवळीच्या प्रचार व प्रसारास निश्चित बळ मिळेल असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी व्यक्त केला.