कराड : साडेपाच- सहा महिन्यांच्या प्रदीर्घ पावसानंतर कडाक्याची थंडी पडणार हे नक्की असताना, सातारा जिल्ह्यात सलग पाच- सहा दिवसांपासून थंडी वाढत चालली आहे. विशेषतः रिकाम्या शेतात, शिवारं आणि नद्यांकाठी थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे.
पहाटेच्या सुमारास थंडगार वाऱ्यांच्या लहरी आणि दाट धुकेही सर्वदूर पसरू लागले आहे. दिवसाही हवेत गारठा असून, संध्याकाळपासून कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे कुडकुडणाऱ्या जीवांना उबदार कपड्यांचा पेहराव करावा लागत आहे. गारवा वाढत चालल्याने पिकांवर दहिवर (दवबिंदू) पडत आहे. त्यामुळे शेतीची कामे रखडताना, लांबलेल्या रब्बीचा पेरा पिछाडीवर पडणार आहे. ही थंडी आणि दवबिंदूंची चादर उभ्या पिकांना फटका देत आहे.
तापमान १२ अंशाखाली
हवामान खात्याच्या माहितीनुसार, तापमानात घट होत असून, किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. दिवसा गारवा असून, सकाळ- संध्याकाळ थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे अबालवृद्धांनी आता कानटोपी, हातमोजे, सॉक्स, स्वेटर, शाल, जॅकेट अशी शरीराला ऊब देणारी कपडे वापरण्यास सुरुवात केली आहे. चहा, कॉफी अशा उष्ण पेयांची मागणी वाढली आहे. चहा, कॉफीची दालने लोकांनी भरल्याचे दिसून येत आहे.
ऊस तोडकऱ्यांचे हाल
मान्सूनपूर्व, मान्सून अन् मान्सुनेत्तर अशा साडेपाच- सहा महिन्यांच्या प्रदीर्घ पावसामुळे खरिपाचे गणित बिघडले, जवळपास तशीच स्थिती रब्बी हंगामाचीही झाली आहे. पावसाळा लांबल्याने रब्बीचा पेराही लांबला. थंडीचे आगमनही महिना-सव्वा महिन्याच्या विलंबाने झाल्याने याचा स्वाभाविकपणे रब्बीच्या पेऱ्यावरही परिणाम झाला आहे.
पावसाच्या सरतेशेवटी उसतोडकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. त्यांच्या पालाच्या झोपड्या पावसाच्या पाण्यात गेल्या. आता, सध्याच्या वाढत्या थंडीमुळे ऊस तोडणी कामगारांचे हाल होत आहेत. सखल भागातील ऊस क्षेत्रातील ओलावा अजूनही हटलेला नसताना, अशा ठिकाणी गारठून गेलेल्या या कामगारांना ऊसतोडीला हवा तसा वेग मिळत नसून, त्याचा साखर कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होत आहे.
