Satara Woman Doctor Suicide Case Supriya Sule Remark : सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी तिच्या तळहातावर सुसाइड नोट लिहून ठेवली असून त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. या सुसाइड नोटमध्ये तरुणीने तिचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव लिहिलं आहे. यापैकी एकजण सध्या फरार आहे.

डॉक्टर तरुणीने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे की पोलीस उपनिरीक्षक बदने यांनी तिच्यावर पाच वेळा बलात्कार केला होता. तसेच पोलीस अधिकारी यांनी तिचा सलग चार महिने मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

सुप्रिया सुळेंचा संताप

दरम्यान, या घटनेमुळे राज्याच्या गृह विभागावर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे की या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शासन करावं. त्यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की “सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने गेल्या काही दिवसांपासून तिचा शारिरिक आणि मानसिक छळ होत असल्याचं वरीष्ठांना वारंवार कळवलं होतं. परंतु, तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचं पाऊल उचललं.”

प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालंच पाहिजे : सुप्रिया सुळे

“या विषयाच्या मूळाशी नेमकं कोणतं कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावं. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे.”

रोहित पवारांचा संताप

दरम्यान,आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पीएसआय बदने याने अत्याचार केल्याचं तर, पोलीस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचं हातावर लिहून ठेवत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे.”

“महिलांनी न्याय कुठे मागायचा?”

“पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव आणला जात असल्याचं कळतंय आणि हे अत्यंत भयानक आहे. या घटनेमुळं गृहखात्याची अब्रू वेशीवर टांगली गेलीच पण पोलीसच असा अत्याचार करत असतील तर महिलांनी न्याय मागण्यासाठी जायचं कुठं? असा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील सगळेच पोलीस वाईट नाहीत पण अशा नराधम पोलिसांमुळं चांगलं काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या नावाला काळीमा लागतो.”

रोहित पवार म्हणाले, “या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जनतेचे रक्षक असूनही भक्षक बनलेल्यांवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे.”