एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड करत सावंतांविरोधात घोषणाबाजीही केली. तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला आहे. ‘प्रत्येकाने आपल्या लायकीत रहावे, वेळ आल्यावर जशास तसे उत्तर दिले जाईल’, असे सावंत म्हणाले.

‘आमचे गटनेते मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं.’ अशी फेसबुक पोस्ट सावंतांनी केली आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांकडून सावंतांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील तापमान चांगलेच तापले आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना सध्या पहायला मिळत आहे. आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफड करण्यात आली. “ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल”, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला होता.