Sawantwadi Dahi Handi 2025 Celebration : सावंतवाडी : अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात चाहत्यांच्या लाडक्या आर्चीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला खास भेट दिली. यावेळी तिने मालवणी भाषेत संवाद साधून उपस्थितांची मने जिंकली. भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली आरपीडी हायस्कूलच्या मैदानावर हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रिंकू राजगुरूने सावंतवाडीत येऊन खूप आनंद झाल्याचं सांगितलं. “भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्यामुळे मला सावंतवाडीत येता आलं. इथे आल्यावर आपल्याच माणसांसोबत असल्यासारखं वाटलं, खूप छान वाटलं,” असं ती म्हणाली.
तिच्या आगमनाची बातमी कळताच रिंकूच्या चाहत्यांनी संध्याकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. रिमझिम पाऊस सुरू असतानाही ढोल-ताशांच्या गजरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रिंकू व्यासपीठावर येताच एकच जल्लोष झाला.
आपल्या भाषणात तिने उपस्थितांना विचारलं, “मराठीत सांगितलं तर कळणार नाही, मालवणीत सांगू?” आणि मग “कशे आसात, बरे आसात मा सावंतवाडीकरांनू?” असं मालवणीत बोलून तिने उपस्थितांशी थेट कनेक्ट साधला. रिंकूच्या या दिलखुलास आणि आपुलकीच्या अंदाजाने सावंतवाडीकरांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला.
रिंकू सावंतवाडीत पहिल्यांदाच आली असल्यामुळे तरुण-तरुणींसह महिला वर्ग देखील रात्री उशिरापर्यंत तिची वाट पाहत होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सुधीर आरीवडेकर यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.