Maharashtra Dahi Handi 2025 Celebration / सावंतवाडी : रिमझिम पावसातही उत्साहात कोणताही खंड न पडता, सावंतवाडी शहरात दहीहंडीचा थरारक उत्सव साजरा झाला. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते. यंदा अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने मुरलीधर मंदिरासमोरील मानाची दहीहंडी फोडून उत्सवाला सुरुवात केली आणि त्यानंतर एकूण २० दहीहंड्या फोडण्याचा मान मिळवला.

​सकाळी सालईवाडा येथील श्री पडते यांच्या निवासस्थानातून श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर संस्थानकालीन मुरलीधर मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि आरती झाली. मानाची दहीहंडी फोडल्यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळाकडे नेत असताना, वाटेत चौकाचौकात लावलेल्या २० दहीहंड्या फोडण्यात आल्या. यावेळी गोविंदांचा आणि उपस्थित नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

​हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीसही जागोजागी तैनात करण्यात आले होते.

​यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमेय तेंडोलकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, विनायक ठाकुर, अतुल केसरकर, बाबु कुडतरकर, प्रतिक बांदेकर, सचिन केसरकर, दिनेश जाधव, सनी जाधव, मयुर लाखे, राकेश लाखे, अमित लाखे, संतोष लाखे, अंकुश लाखे, शुभम लाखे, निखिल कांबळे, फयाज मुजावर, अरूण घाडी, रोहित चव्हाण, नंदू ढकरे यांच्यासह अमेय तेंडोलकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि सावंतवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात एकूण २१ दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या, त्यापैकी शेवटची हंडी रात्री उशिरापर्यंत फोडण्यासाठी चढाओढ सुरू होती.