सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने सावंतवाडी येथे लवकरच जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा विभाग, सावंतवाडी या संस्थेचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या संमेलनात अनेक ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित राहणार असल्याची माहिती साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

​या संमेलनाचा मुख्य उद्देश ‘जिल्ह्यातील दुर्लक्षित साहित्य’ समोर आणणे हा आहे, असे बांदेकर यांनी सांगितले. यावेळी श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भवन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर आणि कार्यवाह रमेश बोंद्रे उपस्थित होते. ​प्रा. बांदेकर यांनी सांगितले की, साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या या मंडळाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. सावंतवाडीत होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनासाठी शासनाकडून ५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्ह्यातून या संमेलनासाठी एकूण नऊ प्रस्ताव सादर करण्यात आले होते, त्यापैकी श्रीराम वाचन मंदिराचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे.

​हे संमेलन साधारणतः २० डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्याचा मानस आहे. दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात विविध साहित्यिक कार्यक्रम घेतले जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखले जाते, तरीही काही साहित्यिक दुर्लक्षित राहिले आहेत. अशा साहित्यकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जिल्ह्यातील दुर्लक्षित साहित्य’ या संकल्पनेवर हे संमेलन केंद्रित असेल.

​या कार्यक्रमात कवी संमेलन, परिसंवाद आणि मुलाखतीसारखे विविध उपक्रम आयोजित केले जातील. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक भूषवणार असून, उद्घाटक म्हणून जिल्ह्यातीलच मान्यवरांना आमंत्रित करण्यात येईल. अनेक वर्षांच्या खंडानंतर जिल्ह्यात हे साहित्य संमेलन होत असल्यामुळे, जुन्या साहित्यिकांचा आणि साहित्यनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करण्याचाही संस्थेचा विचार आहे. हे संमेलन सावंतवाडी शहरात आयोजित केले जाईल, असेही बांदेकर यांनी सांगितले.