सावंतवाडी : बिगरमोसमी पावसाने सावंतवाडी तालुक्याला झोडपून काढले असून, सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वस मंदिरापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर ही घटना घडली. डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तातडीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरड हटवण्याचे काम सुरू केले. युद्धपातळीवर काम करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. वळीवाच्या पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने वाहनधारक आणि स्थानिक नागरिक चिंतेत पडले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यटकांना आणि वाहनधारकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. दरड हटवण्याचे काम वेगाने सुरू असून, लवकरच रस्ता पूर्णपणे मोकळा होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आंबोली घाटाची जबाबदारी

दरम्यान, आंबोली घाट आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे आणि या विभागाने नुकतीच घाटाची डागडुजी केली आहे. असे असतानाही दरड कोसळल्याने आंबोलीतील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत किंवा घडण्याची शक्यता आहे अशा धोकादायक ठिकाणी पुरेसा वेळ आणि लक्ष देऊन सर्वेक्षण करण्याची गरज आहे.

आंबोली: पर्यटन आणि सुरक्षिततेची गरज

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण असून, ‘दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. पावसाळी पर्यटनासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि इतर राज्यांतून हजारो पर्यटक येथे येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंबोली येथील रहिवासी आणि पर्यटनप्रेमी काका भिसे यांनी आंबोली घाटाच्या देखभालीचे महत्त्व अधोरेखित केले. “घाटाच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी पर्यटन हंगामात घाटात दरड कोसळून आर्थिक नुकसान झाले होते, तसे पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,” असे ते म्हणाले. पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. आंबोलीचा पाऊस, दाट धुके, धबधबे आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, ज्यामुळे पावसाळी हंगामात व्यावसायिकांना आर्थिक फायदा होतो. त्यामुळे या घाटाची सुरक्षितता आणि देखभाल ही अत्यंत गरजेची असल्याचे भिसे यांनी सांगितले.