सावंतवाडी: “शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. आम्हाला मुंबई-गोवा व सागरी महामार्ग महत्त्वाचा आहे, शक्तिपीठ नाही,” असा स्पष्ट भूमिका मांडत शक्तीपीठला ठाकरे शिवसेनेचा विरोध माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. रत्नागिरी ते नागपूर हा मोठा रस्ता आधीच सुरू असताना, शक्तिपीठ महामार्ग उभारण्याचा उद्देश काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकल्पासाठी लागणारा निधी शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या हिताचा आहे की, ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्र्यांचे खिसे भरण्यासाठी, असा सवालही त्यांनी केला.
नारायण राणे यांनी पोकळ धमक्या देऊ नयेत, बाधित शेतकरी आणि बागायतदारांसह आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “हिंमत असेल, तर आमच्या तंगड्या तोडायला यावे,” असे आव्हानही त्यांनी दिले.
शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचा ऱ्हास:विनायक राऊत म्हणाले, “शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून जाणार आहे. ८०० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा आणि ८६ हजार कोटी रुपये खर्चून हा महामार्ग तयार होणार आहे. याला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांतील बागा, शेतजमिनी बाधित होणार आहेत. जैवविविधता नष्ट होऊन जंगल उद्ध्वस्त होणार आहे. ३०० फूट रुंदीचा हा शक्तिपीठ उभारताना पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होणार आहे.”
निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली
“लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून शक्तिपीठ होऊ देणार नाही, अशी आश्वासने सरकारमधील मंत्र्यांनी दिली होती. तेव्हाचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री गप्पच बसले होते. आता या महामार्गाच्या मोजणीला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गमधील १२ गावांनी याला विरोध केला आहे. तशी निवेदने शासनाला दिली आहेत. मात्र, सत्तेचा दुरुपयोग करून जबरदस्तीने जमिनी संपादित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा डाव आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभी आहे,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले
“विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, रवींद्र चव्हाणांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई-गोवा महामार्गाची नवी तारीख दिली आहे. अजून बरेच काम शिल्लक असल्याने एक वर्ष तरी लागणार आहे. त्यामुळे ३० जूनचे आश्वासन फसवे ठरणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करायचा नाही. कोस्टल रोड हा खरा भाग्यविधाता आहे. याबाबत सरकार गप्प आहे. शक्तिपीठला होणारा खर्च जागतिक विक्रम मोडणारा आहे. तो निधी शेतकरी आणि जनतेच्या हिताचा आहे की, ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्र्यांचे खिसे भरण्यासाठी, याचे उत्तर द्यावे,” असे आव्हान राऊत यांनी दिले.
नारायण राणेंना आव्हान
“नारायण राणे यांनी पोकळ धमक्या देऊ नयेत. फटके देण्याची भाषा ते करत आहेत. अजूनही त्यांचा मूळ स्वभाव बदललेला नाही. मात्र, जे शेतकरी, बागायतदार आपल्या जमिनी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासह आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. १२ गावांतील ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेणार आहोत. त्यामुळे हिंमत असेल, तर आमच्या तंगड्या तोडायला यावे,” असे आव्हान माजी खासदार राऊत यांनी दिले. “आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी उभे राहणार आहोत. तुम्ही ठेकेदारांच्या हितासाठी आम्हाला फटके देणार असाल, तर आम्हीही मेलेल्या आईचे दूध प्यायलेले नाही. शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना नामशेष करणारा मार्ग आहे. त्याला आमचा ठाम विरोध राहील. विरोधाला विरोध आम्ही केला नाही. प्रकल्पाच्या नावाखाली आजूबाजूच्या गोरगरिबांच्या जमिनी हडपण्याचा डाव आखला होता, त्याला आम्ही विरोध केला. अशा प्रवृत्तींना आम्ही विरोध केला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महिला प्रमुख श्रेया परब, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, रमेश गावकर, बाळू परब, गुणाजी गावडे, शैलेश गौंडळकर, निशांत तोरसकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.