सावंतवाडी: कोकणातील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली ७७ वर्षांची सावंतवाडी अर्बन बँक आता टीजेएसबी सहकारी बँकेत विलीन झाली आहे. या विलीनीकरण सोहळ्याप्रसंगी बोलताना माजी केंद्रीय अर्थमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, “२०४७ मध्ये विकसित भारताची संकल्पना साकार करायची असेल, तर सहकारा शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.
सावंतवाडी अर्बन बँकेच्या टीजेएसबी बँकेतील विलीनीकरणामुळे सावंतवाडीतील नागरिकांना आता अधिक चांगल्या दर्जाच्या बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत. या विलीनीकरणामुळे बँकिंग सेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचतील आणि त्यामुळे आर्थिक समावेशनाला मोठी चालना मिळेल. स्थानिक ग्राहकांना अधिक मजबूत आर्थिक पर्याय उपलब्ध होतील आणि सहकारी बँकिंग क्षेत्रही अधिक स्थिर होईल, असे मत सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना सुरेश प्रभू यांनी कोकणातील जनतेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “कोकणी जनतेमुळेच मी राजकीय क्षेत्रात पदार्पण करू शकलो. त्यांना मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे माझे उर्वरित आयुष्य कोकणी जनतेच्या विकासासाठी समर्पित असेल.”
सुरेश प्रभू यांच्या हस्ते आणि माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर व टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी येथे टीजेएसबी सहकारी बँकेच्या १५० व्या शाखेचे शानदार उद्घाटन झाले.
या उद्घाटन समारंभाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर, बँक अध्यक्ष शरद गांगल, उपाध्यक्ष वैभव सिंगवी, मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर, सौ. उमा प्रभू, बाबा चांदेकर, अँड. सुभाष पणदूरकर, रमेश बोंद्रे, गोविंद वाडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यातील विशेष अतिथी, राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी या विलीनीकरणामुळे सिंधुदुर्ग विभागातील आर्थिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील, असे मत व्यक्त केले.
टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल म्हणाले, “हे विलीनीकरण केवळ बँकेचा विस्तार नाही, तर आम्ही सहकारी बँकिंग क्षेत्रातील आमची उपस्थिती अधिक व्यापक करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण विभागात आमचा विस्तार आता अधिक मजबूत झाला आहे. हा टप्पा आम्हाला सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या दिशेने पुढे नेणारा आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सहकारी बँकिंग क्षेत्राच्या मजबूतीसाठी रिझर्व्ह बँकेने सुचवलेल्या धोरणात्मक उपायांमध्ये या विलीनीकरणाचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबतची घोषणा ९ मे २०२५ रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर केली होती. या धोरणात्मक विस्तारामुळे बँकेची सेवा क्षमता अधिक वाढली असून, बँकेने आपल्या वाढत्या ग्राहकवर्गासाठी अधिक चांगल्या सेवा पुरवण्याची तयारी दर्शविली आहे.
संपूर्ण नियामक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व नऊ शाखा आता टीजेएसबी सहकारी बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत झाल्या आहेत. यामुळे टीजेएसबी बँकेच्या शाखांची संख्या १४९ वरून १५८ झाली आहे. सावंतवाडी येथील मुख्य शाखेचे उद्घाटन टीजेएसबी बँकेची १५० वी शाखा म्हणून करण्यात आले, असे अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले.