सांगली : दिवाळी संपली तरी अद्याप थंडीची चाहूल लागली नसली तरी कृष्णाकाठी परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून यंदा प्रथमच औदुंबर परिसरातील कोंडार परिसरात सोनचिखल्या पक्ष्याचे आगमन पक्षीप्रेमींना सुखद धक्का देणारे ठरले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून हा पक्षी पहिल्यांदाच कृष्णाकाठी विसावला आहे.
औदुंबरपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर कोंडार हा नदीचा उथळ भाग आहे. या भागात दरवर्षी परदेशी पाहुणे थंडीच्या हंगामात आश्रयाला येतात. यावेळी पहिल्यांदाच सोनचिखल्या या पक्ष्याचे आगमन झाले असल्याचे पक्षीनिरीक्षक संदीप नाझरे यांनी सांगितले. पक्षीप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी असून, या नोंदीमुळे कृष्णा नदीकाठचा हा भूभाग आंतरराष्ट्रीय पक्षी स्थलांतर मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
औदुंबरजवळ असलेल्या आमणापूर (ता. पलूस) गावच्या हद्दीत कोंडार हा कृष्णा नदीकाठचा उथळ पाण्याचा भूभाग असून, हा भाग परदेशी पाहुण्या पक्ष्यांच्या भेटीसाठी प्रसिद्ध आहे. नाझरे यांनी यंदा सोनेरी चिखल्यासह, छोटा अर्ली, हिरवा तुतवार, कंठेरी चिखल्या, ठिपकेवाली तुतारी, ठिपकेदार तुतवार, पांढरा धोबी, पिवळा धोबी अशा अनेक परदेशी पाहुण्या पक्ष्यांची नोंद घेतली आहे.
तसेच या ठिकाणी स्थानिक पक्ष्यांमध्ये रंगीत करकोचे, खुल्या चोचीचे करकोचे, चमचे, ताम्रमुखी टिटवी, नदीसुरय, आयबीस, पारवे, होले, शेकाट्या, हळदी कुंकू बदक, पाणकावळे अशा अनेक पाणथळीच्या पक्ष्यांचा किलबिलाट सध्या या कोंडार परिसरात अनुभवास मिळत आहे. सोनेरी चिखल्या (पॅसिफीक गोल्डन प्लोवर) हा एक मध्यम आकाराचा, लांब पल्ल्याचा स्थलांतर करणारा पक्षी आहे. हा पक्षी त्याच्या पिसाऱ्यातील सोनेरी-पिवळसर ठिपक्यांमुळे ओळखला जातो. त्याचा मागील भाग गडद तपकिरी असून त्यावर सोन्यासारखे पिवळे ठिपके असतात. स्थलांतरादरम्यान आणि हिवाळ्यात हा पिसारा अधिक तपकिरी आणि सोनेरी दिसतो.
सांगली जिल्ह्यातील पहिली नोंद
हा पक्षी प्रामुख्याने टुंड्रामध्ये (सायबेरिया, अलास्का) प्रजनन करतो आणि हिवाळ्यात तो लांब पल्ल्याचा प्रवास करून दक्षिण आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या उष्ण प्रदेशांमध्ये स्थलांतर करतो. दलदलीच्या भागात, चिखलात आणि उथळ पाण्यात तो आपली चोच खुपसून छोटे कीटक, किडे, अळ्या आणि छोटी जलचरे शोधून खातो. या पक्ष्याची सांगली जिल्ह्यात प्रथमच झालेली नोंद अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्यामुळे या कोंडार परिसराचे पक्षी- अधिवासाच्या संवर्धनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित होते.
