रत्नागिरी : कोकणातील आंबा-काजू आणि मासळी जेएनपीटी बंदराऐवजी जयगड येथील बंदरातून परदेशात पाठवण्यासाठी रत्नागिरीत मँगो पार्क, मरिन पार्क आणि कॅश्यू पार्क उभारण्यासाठी उद्योग खात्याने तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये राज्यातील अन्य पाच जिल्ह्यांबरोबर रत्नागिरीत ‘लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड कंटेनर पार्क’ उभारण्यास मान्यता मिळाली आहे. त्याला आवश्यक जागा एमआयडीसीमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. तसेच कोकणातील आंबा, काजू, मासळी जेएनपीटी बंदरातून परदेशात पाठविले जातात. रत्नागिरी तालुक्यात जयगड येथे जिंदाल, आंग्रे पोर्टसह तीन मोठी बंदरे एकाच परिसरात आहेत. त्यांचा उपयोग करून कोकणात पिकणारे आंबा, काजू, मासळी परदेशात पाठवणे शक्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उसाची मळीही जयगडमधील या बंदरातून पाठविली जाते. या सर्वासाठी आवश्यक जागा जयगड परिसरात उपलब्ध करून दिली जाईल. त्याचबरोबर वाटद-खंडाळा येथील शेतकऱ्यांशी चर्चा करून कातळावरील पडीक जमिनीचा उपयोग करून प्रदूषणविरहित कारखाना आणण्याचा विचार आहे; परंतु जागा निवडताना लोकवस्ती, मंदिरे, मशीद किंवा अन्य कोणतीही वास्तू तेथे नसेल याची खात्री केली जाईल. उद्यमनगर (रत्नागिरी) येथील स्टरलाइटच्या जागेसंदर्भात अनिल अगरवाल यांच्याशी चर्चा सुरू आहे. हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. पण तेथे कोणताही उद्योग आणला जाऊ शकतो. कोकणातील मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू असून लोटे, देवरुख, रत्नागिरीतील आजारी उद्योगांना बँकांचे अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याबाबतचा अहवाल मागवला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Separate mechanism by industrial department in ratnagiri for export of mango cashew fish zws
First published on: 07-09-2022 at 01:52 IST