गडचिरोली जिल्ह्य़ाच्या चामोर्शी तालुक्यातील येदनुर, मुरमुरी व पवीमुरांडा या गावाला जोडणाऱ्या पुलाजवळ नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात सी-६० पथकातील सात पोलीस जवान शहीद झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेली ही घटना महाराष्ट्रातील पोलीस दलावर २०१०नंतर झालेला सर्वात मोठा नक्षली हल्ला आहे.  
गडचिरोली या जिल्ह्य़ाच्या ठिकाणाहून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर चामोर्शी हे तालुक्याचे ठिकाण आहे. या भागात नक्षलवादी दाखल झाले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेमार्फत मिळाल्यानंतर तीन दिवसांपूर्वी सी-६० पथकातील ७० जवान पवीमुरांडा या गावी दाखल झाले. तेथून सर्व जवान नक्षल शोधमोहीम राबवित येदनुर, मुरमुरी, पवीमुरांडा व परिसर पायी पिंजून काढत होते. ही शोधमोहीम रविवारी संपणार असल्याची माहिती नक्षलवाद्यांना होती. त्यानुसार, सी-६० जवानांच्या परतीच्या मार्गावर, येदनुर व मुरमुरी या दोन गावांमधील पुलाजवळील रस्त्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग पेरून ठेवले. रविवारी सकाळी सी-६०चे जवान येदनुर येथून पाच ते सहा सुमो गाडय़ांमधून चामोर्शीला जाण्यासाठी निघाले होते. या ताफ्यातील दोन गाडय़ा पुलावरून गेल्यानंतर सशस्त्र नक्षलवाद्यांनी तिसरी गाडी भूसुरुंग स्फोट करून उडवली. हा स्फोट इतका भीषण होता की सुमो २०-२५ फूट उंच हवेत उडाली व तिच्या ठिकऱ्या झाल्या. जखमी जवानांवर नागपूरला खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. या दोघांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असली तरी प्रकृती धोक्याबाहेर आहे.

शहीद पोलीस
पोलिस शिपाई तिरुपती आलाम (रा.चिट्टर अंकीसा), सुनील मडावी (रा. चंद्रपूर), दुर्योधन नाकतोडे (रा.वडसा), रोशन डंभारे (रा.चामोर्शी), सुभाष कुमरे, दीपक विधाते (रा.गडचिरोली), टाटा सुमोचालक लक्ष्मण मुंडे (रा.अंतरवेली, जिल्हा परभणी)

जखमी
हेमंत मोहन बनसोड
व पंकज शंकर सिडाम

प्रा. साईबाबाच्या अटकेचा सूड?
नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय समितीचा प्रमुख प्रा. जी. एल. साईबाबा याच्या अटकेनंतर अवघ्या तीन दिवसांत नक्षलवाद्यांनी ही मोठी हिंसक कारवाई केली. त्यामुळे साईबाबाच्या अटकेनंतर नक्षलवादी घातपात घडवून आणण्यासाठी अधिक सक्रिय झाले होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही वर्षांत गडचिरोलीत एकही मोठी हिंसक घटना झालेली नव्हती. परंतु आजच्या घटनेने गडचिरोली पोलीस दलाला जबर हादरा बसला आहे.