सावंतवाडी : माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले की, शक्तीपीठ महामार्ग आता तिलारी आणि रेडीपर्यंत विभागून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दोडामार्ग तालुक्यात प्रस्तावित असलेला अम्युझमेंट पार्क, तिलारीचा परिसर आणि सागरी किनारा रेडीपर्यंतच्या विकासासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल. यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात येतील आणि जिल्ह्याची आर्थिक स्थिती सुधारेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना केसरकर यांनी महायुतीमधील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, सद्यस्थितीत महायुतीची राजकीय परिस्थिती चांगली आहे. जिल्ह्यातील खासदार, पालकमंत्री आणि आमदार सर्व महायुतीचे आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी वादग्रस्त विधान करू नये, असा कानमंत्र त्यांनी दिला. यामुळे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र राहतील आणि विकासाला गती मिळेल, असेही ते म्हणाले.

आपल्या नुकत्याच झालेल्या इंडोनेशिया आणि सिंगापूर दौऱ्याचा अनुभव सांगताना केसरकर म्हणाले की, त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन विकसित झाले आहे. त्याच धर्तीवर तिलारी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अम्युझमेंट पार्क उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पासाठी अनेक निविदा मागवण्यात आल्या, पण अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, शक्तीपीठ महामार्ग आल्यास या प्रकल्पाला निश्चितच चांगले दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिलारीकडे जाणारे रस्ते अधिक चांगल्या दर्जाचे (काँक्रिटचे) करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तसेच विविध पर्यटन प्रकल्प मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत.

यावेळी जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत कुरघोडीवर विचारले असता, त्यांनी सांगितले की, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र राहावे आणि वाद निर्माण होतील अशी वक्तव्ये टाळावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे आगामी काळात अशा प्रकारचे कोणतेही वादग्रस्त विधान येणार नाही, असा कानमंत्र दिला आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, खासदार, आमदार व पालकमंत्री एकाच विचारांचे मिळाले आहेत त्यामुळे अशा चांगल्या वातावरणात भांडू नका असे आवाहन त्यांनी केले.