सांगली : शक्तिपीठ महामार्गासाठी रेखांकन करण्यास सुरुवात होताच बुधवारी शेटफळे (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली. शेतकऱ्यांनी रानात झोपून जमीन मोजणीला विरोध केला. महामार्गाला शेतकऱ्यांचा असलेला विरोध मोडून काढण्यासाठी गेल्या महिन्यात शासनाच्यावतीने संवाददूत नियुक्त करून गावोगावी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न शेतकऱ्यांनी संघटितपणे उधळून लावला. जिल्ह्यातील १९ गावातून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. आज पुन्हा पोलीस बंदोबस्तात भूसंपादन आणि रेखांकन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता.

आज शेटफळे (ता. आटपाडी) येथे महामार्गाच्या रेखांकन करण्यासाठी महसूल विभागाकडून तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक विनय बहीर हे जातीने हजर होते. यापूर्वीही प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी दोन वेळा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो निष्फळ ठरल्याने आज पोलीस बंदोबस्तात रेखांकनाची कारवाई पुढे रेटण्याचा प्रयत्न प्रशासनाचा होता. शेटफळे गावातील ४२९ शेतकऱ्यांची ४० हेक्टरहून अधिक जमीन महामार्गासाठी अधिगृहित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज जमीन मोजणीसाठी आलेल्या महसूल पथकाला शेतकऱ्यांनी आडवे झोपून विरोध केला. भूसंपादनाबाबत भरपाईचे निकष काय असतील याची विचारणा केली. तसेच कोणत्याही स्थितीत पिकाखालील जमीन अधिगृहित करू देणार नाही, अशी भूमिका मांडत शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अशी आग्रही मागणी केली.