राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीमधला आमदारांचा मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे शिवसेनेचा शिंदे गट ठाकरे गटापासून वेगळा झाला होता, तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा शिंदे गटाबरोबर सत्तेत बसला आहे. तसेच शिंदे गटातले अनेक आमदार मंत्रीपद मिळेल या आशेवर बसले होते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला. या पक्षाला नऊ मंत्रीपदं मिळाली आहेत. त्यामुळे शिंदे गटातले आमदार नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

शिंदे गटातील आमदार भरत गोगावले आणि शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यांची नाराजी अनेकदा व्यक्त केली आहे. नाराजीबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर आमदार भरत गोगावले म्हणाले “नाराज होऊन काय करणार? वस्तुस्थिती स्वीकारावी लागणार आहे. थोडीफार नाराजी राहणार आहे. ज्यांना एक भाकरी खायची होती, त्यांना अर्धी मिळाली, ज्यांना अर्धी खायची होती त्यांना पाव भाकरी मिळाली. सगळं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे समीकरण स्वीकारायला पाहिजे”.

हे ही वाचा >> “अजित पवार आमचे नवे साथी, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, म्हणाले, “त्यांच्या येण्याने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नाराजीबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारला. त्यावर देसाई म्हणाले, माझा चेहरा बघा किती फ्रेश आहे. मी तुम्हाला नाराज दिसतो का? आमच्या पक्षात बिलकूल नाराजी नाही. ज्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही तेदेखील नाराज नाहीत. उलट आम्हा सगळ्यांना, सर्व ५० आमदारांना वाटतं की आम्ही सगळेच मंत्री आहोत. आम्ही आमच्या माना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भक्कम खांद्यावर ठेवल्या आहेत. तो खांदा खूप मजबूत आहे. अजित पवार यांच्या शपथविधीपूर्वी महायुतीत नऊ पक्ष होते, त्यात आता १० वा पक्ष सहभागी झाला आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे.